धक्कादायक ! कोरोनाच्या कहरमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची लहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 13:04 IST2020-05-12T13:01:11+5:302020-05-12T13:04:47+5:30
शारीरिक अंतर पाळण्याचा नियम धाब्यावर बसवून येथील नागरिकांनी या पार्टीत सहभाग घेतला.

धक्कादायक ! कोरोनाच्या कहरमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची लहर
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा कहर वाढत असून रुग्णसंख्या ६५१ वर पोहोंचली आहे. मात्र काही नागरिकांना याबाबत गांभीर्य नसून सिडको एन -३ येथील कैलास अपार्टमेंटच्या परिसरात दोन कुटुंबांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजयनगर, रामनगर आणि पुंडलिक नगर हे हॉटस्पॉट जवळ असतानाही शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमाचा उल्लंघन करून या उच्चभ्रू सोसायटीत अशा पद्धतीने नागरीक एकत्र आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजयनगर व पुंडलिकनगर या हॉटस्पॉटजवळ सिडको एन -३ चा भाग येतो. येथील कैलास अपार्टमेंटमध्ये अनुप विजयप्रकाश असोका व दत्तात्रय विश्वनाथ जाधव हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. सोमवारी असोफा आणि जाधव यांच्या दोघांच्याही लग्नाचा वाढदिवस होता. यामुळे त्यांनी रात्री १० वाजेच्या दरम्यान लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोसायटीमधील १२ ते १५ जणांचा जमाव जमवला. तसेच अपार्टमेंटच्या खालील सार्वजनिक जागेत त्यांनी टेबल मांडून सर्वांसोबत केक कापला. यावेळी शारीरिक अंतर पाळण्याचा नियम धाब्यावर बसवून येथील रहिवास्यांनी या पार्टीत सहभाग घेतला.
याची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे एल.बी. हिंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुप विजयप्रकाश असोका व दत्तात्रय विश्वनाथ जाधव यांच्यासह उपस्थित १२ ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे येथील नागरिकांना चांगलेच महागात पडले असल्याचे दिसत आहे.