धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सोशल मिडियात बनावट खाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:23 IST2025-11-05T19:20:56+5:302025-11-05T19:23:01+5:30
तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आस्तिककुमार पांडेय यांच्यानंतर आता जिल्हाधिकारी स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियात बनावट खाते

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सोशल मिडियात बनावट खाते
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावे सोशल मीडियात बनावट खाते तयार केल्याचा प्रकार समोर येताच प्रशासनाने मंगळवारी सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्याकडे तक्रार दिली. जाधव यांनी सांगितले, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट खातेधारकाविरोधात कारवाईचा तक्रार अर्ज आला आहे.
संबंधित खातेधारकाची लिंक व इतर माहिती ‘मेटा’ कंपनीला कळविली असून, पूर्ण तपशील मागविला आहे. तसेच बोगस खाते उघडणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावरूनही माहिती काढल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल. अलीकडच्या काळात सनदी अधिकाऱ्यांच्या नावे सोशल मीडियात बोगस खाते उघडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार समोर येत आहेत.
धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नावाने अनेक बोगस खाते उघडून पैशांची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आस्तिककुमार पांडेय यांच्यानंतर आता जिल्हाधिकारी स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियात बनावट खाते उघडून पैसे मागण्यात आले.