धक्कादायक ! वैफल्यग्रस्त गिरणी चालकाची पाण्याच्या ड्रममध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 14:10 IST2020-12-21T14:07:41+5:302020-12-21T14:10:55+5:30
suicide news मागील काही दिवसांपासून गिरणी चालक हे दरवाजा बंद करून दिवस-दिवस घरात बसून राहायचे.

धक्कादायक ! वैफल्यग्रस्त गिरणी चालकाची पाण्याच्या ड्रममध्ये आत्महत्या
औरंगाबाद : वैफल्यग्रस्त पिठाच्या गिरणी चालकाने स्वत:च्या घरात पाण्याने अर्धवट भरलेल्या ड्रममध्ये बसून जीव दिल्याची धक्कादायक घटना बनेवाडी येथे रविवारी दुपारी उघडकीस आली. बाळू भिवसन औचरमल (४०), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
बनेवाडी येथील बुद्धविहाराजवळ बाळू औचरमल यांचे घर आहे. बाजूच्या खोलीत त्यांची वृद्ध आई राहते, तर जवळच मोठा भाऊ राहतो. बाळू स्वत:ची पिठाची गिरणी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कधी-कधी ते दुसऱ्याच्या गिरणीतही कामाला जात असे. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली असून, त्यांचा मुलगा आजीकडे राहतो. त्याला एक मुलगी असून, तिचे लग्न झालेले आहे. मागील काही दिवसांपासून बाळू हे दरवाजा बंद करून दिवस-दिवस घरात बसून राहायचे. शुक्रवारी दुपारी त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यांच्या आईने दोन दिवस त्यांना आवाज दिला; पण त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.
अखेर रविवारी दुपारी विहाराजवळ उभे असलेले नितीन दाभाडे व अन्य तरुणांना बाळू यांच्या वृद्ध आईने दोन दिवसांपासून दरवाजा उघडत नाही, तुम्ही तरी त्याला आवाज द्या, अशी विनवणी केली. तेव्हा त्या तरुणांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला; पण आतून दरवाजाला ड्रम आडवा लावल्यामुळे तो ढकलत नव्हता. शेवटी पत्रे उचकटून पाहिले असता पाण्याने अर्धवट भरलेल्या ड्रममध्ये बसलेल्या अवस्थेत बाळू हे मरण पावल्याचे दिसून आले.
ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना कळविली. नागरिकांनी बाळू औचरमल यांचा मृतदेह ड्रमसह घाटीत नेला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.