औरंगाबादला दुहेरी धक्का ! कोरोनाचा १८ वा बळी, आणखी ७ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ६८४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:35 IST2020-05-13T18:33:38+5:302020-05-13T18:35:21+5:30
एकाच दिवसात तीन मृत्यू आणि ३१ पॉझिटिव्ह असा दुहेरी धक्का बुधवारी शहरवासियांना बसला आहे.

औरंगाबादला दुहेरी धक्का ! कोरोनाचा १८ वा बळी, आणखी ७ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ६८४
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा १८ वा बळी गेला असून सिल्कमील कॉलनी येथील एका ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी सकाळी २४ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाल्यानंतर सायंकाळी आणखी ७ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ६८४ झाली आहे. एकाच दिवसात तीन मृत्यू आणि ३१ पॉझिटिव्ह असा दुहेरी धक्का बुधवारी शहरवासियांना बसला आहे.
शहरात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी समोर आले. बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनीतील ९४ वर्षीय वृद्धेचा आणि गारखेडा परिसरातील हुसैन कॉलनीतील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सायंकाळी एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. सिल्कमिल कॉलनी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. या महिलेला मंगळवारी खाजगी रूग्णालयातून घाटीत रेफर करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे ४ वाजता महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. या तीन मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १८ झाली आहे. दरम्यान, सायंकाळी आढळून आलेल्या ७ रुग्णांत जयभवानीनगर येथील ४, सिल्कमिल कॉलनी , सातारा परिसर आणि कैलासनगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली.
आरटीओ कार्यालयाची खबरदारी
आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एका रुग्णाचे निदान झाले. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ नये, ऑनलाईन पद्धतीने काम करण्याची सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.
पाच नवीन हॉटस्पॉट
हुसैन कॉलनी, गारखेडा परिसरातील विजयनगर, जय भवानी नगर, रहेमानिया कॉलनी आणि अरुणोदय कॉलनी या पाच हॉटस्पॉटची शहरात भर पडली आहे. त्याबरोबर नंदनवन कॉलनीच्या परिसरातील अन्य भागांतही कोरोनाने शिरकाव केला आहे.