धक्कादायक ! देशात प्रत्येक तासाला १२ मुलांचे अपहरण; बाल कल्याण समितीची माहिती
By राम शिनगारे | Updated: October 12, 2022 20:23 IST2022-10-12T20:23:16+5:302022-10-12T20:23:28+5:30
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सुचनेनुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 'बाल हक्क संरक्षण' विषयावर एमजीएममधील आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

धक्कादायक ! देशात प्रत्येक तासाला १२ मुलांचे अपहरण; बाल कल्याण समितीची माहिती
औरंगाबाद : देशात प्रत्येक तासाला तब्बल १२ अल्पवयीन मुलांचे अपहरण (मिसिंग) होत असल्याची नोंद होते. प्रत्येक दिवसाचे हे प्रमाण २८८ एवढे अवाढव्य आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार २०२० या वर्षामध्ये तब्बल ६० हजार मुलांचे अपहरण झाले. त्यातील मोठ्या संख्येने मुलांचा शोध लागलेला नसल्याची धक्कादायक माहिती बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी कार्यशाळेत बोलताना दिली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सुचनेनुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 'बाल हक्क संरक्षण' विषयावर एमजीएममधील आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. आशा शेरखाने-कटके, महिला व बालविकास अधिकारी बी.एल. राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड.शेरखाने-कटके म्हणाल्या, आपल्या देशात मुले मिसिंग होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचवेळी अल्पवयीन मुलांना साबयर क्राईमचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात मोबाईलवरुन छेड काढणे, पाठलाग करणे, अश्लिल साहित्य पाठवणे असे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमांसह सायबर कायद्याचेही कलम लावावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नसल्याचेही ॲड.शेरखाने-कटके यांनी सांगितले.
अधीक्षक कलवानिया, राठोड यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन ग्रामीण भरोसा सेलच्या सपोनि अर्चना पाटील यांनी तर आभार शहर भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी मानले. कार्यशाळेत शहर आणि ग्रामीण भागातील अंमलदार, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेत यांनी केले मार्गदर्शन
फॉरेन्सिक विभागाचे चरणसिंग कायटे यांनी बालक, महिलांविषयीच्या साबयर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणे, ॲड. अनिता शिऊरकर यांनी बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समितीचे कामकाज, डॉ. मनोहर बन्सवाल यांनी बाल संरक्षणात पोलिसांची भूमिका, प्रा. अपर्णा कोत्तापल्ले यांनी पोक्सो कायद्याचे महत्व, सरकारी अभियोक्त ॲड. देशपांडे यांनी बालकांच्या गुन्ह्यातील दोषसिद्धी वाढविणे, ॲड. सुप्रिया इंगळे यांनी जेजे ॲक्ट आणि बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांनी बाल विवाह कायद्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.