ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 21:24 IST2025-04-01T21:23:47+5:302025-04-01T21:24:52+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर शिवसेना ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. गेल्या काही काळापासून एक-एक करत उद्धव ठाकरेंचे शिलेदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. आधी कोकण आणि आता मराठवाड्यात ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
मराठवाड्यात ठाकरेंना धक्का
विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात पक्षात प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. आता अखेर त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोपवला. विशेष म्हणजे, राजू शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरेंवरची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आणि आपल्या समर्थकांसह पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
राजू शिंदेंनी पत्रात काय म्हटले?
उद्धव ठाकरे आणि अबांदास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आपण ही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत. परंतु मी काही कारणास्तव तसेच माजाी खासदार चंद्रकांत खैर साहेब यांच्या बद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्या सह शिवसेना पक्षाचा आणि विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो स्वीकारावा, असे राजू शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
संजय शिरसाठांविरोधात 1 लाख मते मिळवलेली..
राजू शिंदे यांनी ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेली होती. विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांना 1 लाख 6 हजार 147 मते पडली होती. तर, संजय शिरसाठ यांना 1 लाख 22 हजार 498 मतं मिळाली होती. दरम्यान, राजू शिंदे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. पण, अद्याप त्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.