छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग ठरतोय ‘मनस्ताप मार्ग’!

By सुमित डोळे | Updated: May 20, 2025 13:39 IST2025-05-20T13:38:08+5:302025-05-20T13:39:50+5:30

चार विभागांमध्ये विसंवाद असल्याने सगळाच घोळ; अवजड वाहनांचा प्रवेश बंद केल्याशिवाय गत्यंतर नाही, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Shivajinagar subway in Chhatrapati Sambhajinagar is becoming a 'path of sorrow'! | छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग ठरतोय ‘मनस्ताप मार्ग’!

छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग ठरतोय ‘मनस्ताप मार्ग’!

छत्रपती संभाजीनगर : रविवारी पावसाचे पाणी कंबरेपर्यंत साचल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शिवाजीनगर भुयारीमार्गाच्या लांबी, उंची व रुंदीवरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. या भुयारी मार्गातून बस, अवजड वाहन पास होत असताना रोज किमान २० पेक्षा अधिक वेळा, किमान १० ते १५ मिनिटे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. यासाठी वाहतुक पोलिसांनी लोखंडी कमानीची उंची वाढविण्याची सातत्याने सूचना केली. पत्रव्यवहारही केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांनी १४ वर्षे या भुयारी मार्गासाठी लढा दिला. सातारा, देवळाई परिसरात जवळपास पाच लाख नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला शिवाजीनगर भुयारीमार्ग चार शासकीय विभागांच्या विसंवादामुळे डोकेदुखी सिद्ध होत आहे. लोकार्पण होताच मार्गाच्या दोन्ही बाजूला रिक्षाचालकांचा विळखा पडला. शिवाय, भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान जड, अवजड वाहनांचा विचारच केला गेला नाही. परिणामी, रोज दिवसाला किमान २० पेक्षा अधिक वेळा येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग 'नसून अडचण असून मनस्ताप', अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

काय आहेत अडचणी ?
-भुयारी मार्गासाठी वाहनांच्या वजनाबाबत कोणताही नियम नाही.
-देवळाईकडून शिवाजीनगर चौकात येताच शिवाजीनगरच्या दोन्ही दिशेला जड, अवजड वाहनांना वळण घेण्यासाठी पुरेशी जागाच नसल्याने वाहनांची गती मंदावते.
-चौकाच्या दोन्ही दिशेला रिक्षाचालक, दुकानांसमोर वाहने रस्त्यावरच उभी केली जातात.
-जड, अवजड वाहनांसह अक्षरश: वाळूच्या हायवांची येथून ये-जा होते. परिणामी, जड वाहनांचा जाताना वेग कमी होऊन वाहतूक मुंगीच्या गतीने पुढे सरकते.
-देवळाई चौकात छोटे बेट असणे अपेक्षित होते. मात्र, ते नसल्याने बेशिस्तपणे वाहनांची ये-जा होते.

लोखंडी कमानीची उंची कमी करणे अत्यावश्यक
पुलाच्या कामादरम्यान पोलिसांचे मत विचारात घेतले नाही. आता मात्र अवजड वाहनांमुळे रोज वाहतुकीचा खोळंबा होतो. मनपाने बसवलेली लोखंडी कमानीची उंची मोठी ठेवली. जड वाहनाला देवळाई व शिवाजीनगर चौकात पुरेशी जागाच नसल्याने नियमित कोंडी होते. परिणामी जड, उंच वाहने जाण्यास बंदी घालून लोखंडी कमानीची उंची कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागतिक बँकेच्या प्रकल्प विभागाला पत्र लिहिले. मात्र, त्याला प्रतिसाद दिला गेला नाही.

चौकातील रस्ता अरुंद
भुयारी मार्गातून देवळाई चौकाकडे बाहेर पडल्यानंतर चौकातील चारही बाजुला अर्धाअधिक रस्ता मातीचा आहे. परिणामी, रस्ता अरुंद झाल्याने वळण घेणारी वाहने थेट चौकापर्यंत जातात. परिणामी, रोज कार्यालयीन वेळेत येथे वाहतूक मंदगतीने पुढे सरकते.

उड्डाणपुलाची मागणी ते भुयारी मार्ग लोकार्पणापर्यंतची प्रक्रिया
-२०११ पासून सात वर्षे नागरिकांचा शिवाजीनगर चौकात उड्डाणपुलासाठी संघर्ष.
-२०१४ मध्ये उड्डाणपूल शक्य नसल्याचे विभागांनी सांगितल्याने भुयारी मार्गाचा पर्याय.
-२०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल.
-२०२१ मध्ये न्यायालयाच्या आदेशावरून चार विभागांची समिती स्थापन.
-ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात.
-१५ ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन.
-१४ फेब्रुवारी २०२५ रोजी लोकार्पण.

असा आहे भुयारी मार्ग
-जवळपास २५ कोटींची गुंतवणूक.
-६.९२ कोटींत जवळपास १,८०० चौरस मीटर जागेचे भूसंपादन.
- संपूर्ण भुयारी मार्ग २२.७६ मीटर लांब व ३.५ मीटर उंच.

Web Title: Shivajinagar subway in Chhatrapati Sambhajinagar is becoming a 'path of sorrow'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.