छत्रपती संभाजीनगरात शिवकालीन शस्त्रे, नाणी प्रदर्शन पाहून भारावले शिवप्रेमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:27 IST2025-02-17T15:26:30+5:302025-02-17T15:27:17+5:30
३०० शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगरात शिवकालीन शस्त्रे, नाणी प्रदर्शन पाहून भारावले शिवप्रेमी
छत्रपती संभाजीनगर : शिवजन्माेत्सवानिमित्त उद्धवसेनेच्या वतीने रविवारी शहरातील क्रांती चौक येथे शिवकालीन शस्त्रे, नाणी आणि मोडी लिपीतील साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात ठेवण्यात आलेली शस्त्रे, शिवकालीन, मुघलकालीन नाणी आणि अन्य साहित्य पाहून शिवप्रेमी भारावले.
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून उद्धवसेनेच्या वतीने रविवारी क्रांती चौक येथे शिवकालीन शस्त्रे, नाणी प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारंपरिक वाद्य आणि ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले संग्रहालयाने संग्रहित केलेल्या ३०० शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शहरातील शिवप्रेमींसाठी दिवसभर हे शस्त्र प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहर संघटक सचिन तायडे यांनी संचालन केले.
नव्या पिढीसाठी...
सध्याच्या सर्व तरुणांना शिवकालीन, मराठेकालीन व ऐतिहासिक शस्त्रांची माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज व मराठा साम्राज्यातील सैनिक वजनदार शस्त्रासह कसे युद्ध करत होते, याची जाणीव हे प्रदर्शन बघितल्यानंतर सर्वांना व्हावी या उद्देशाने प्रदर्शन भरविण्यात आले. प्रेरणा, शक्ती, ऊर्जा आणि ताकद या प्रदर्शनातून मिळाली.
- आ. अंबादास दानवे
ज्ञानात भर
प्रदर्शनात तलवार, गुर्ज मराठा धोप, विजयनगर साम्राज्यात वापरली जाणारी कट्यार, वाघनखे, ब्रिटिश तलवार, भाला, कत्ती तलवार, मराठा तलवार, मुघल तलवार, राजपूत तलवार, ठासणीची बंदूक, माडू, दांडपट्टा, ढाल, तोफगोळा, तोफ, कुलपी गोळा, जबरदंड, जननाळ, तेगा तलवार, मराठा कट्यार, मुघल कट्यार, गड किल्ल्याचे कुलूप, कुकरी, अंकुश, चिलानम, बिचवा, धनुष्यबाण, राजपूत तलवार, खंजराली, जांबिया व गुप्ती अशी ३०० शिवकालीन व ऐतिहासिक शस्त्रे प्रदर्शनात आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वीचे नाणे अन्...
हिंदवी स्वराज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल नाणी शिवराई, शिवरायांची दुदांडी नाणी, रायगडी शिवराई, पेशवेकालीन मराठा नाणी पाहिली. यासोबतच रामराजे यांच्या काळातील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे एक नाणे प्रदर्शनात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष बाजीप्रताप पाटील यांनी सांगितले. या प्रदर्शनाची माहिती पवनदीप टाकणखार, निखिल नरवाड, पंडित कदम आणि विशाल इंगळे यांनी नागरिकांना दिली.