छत्रपती संभाजीनगर : ‘जाणता राजा’ व छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रिंट केलेले झेंडे आपण सर्वांनी बघितले असेल. पण, यंदा अंगठ्या, लॉकेट, ब्रेसलेटवर शिवराय अवतरल्याचे पाहण्यास मिळत आहे. एवढेच नव्हे तर शिवजयंतीच्या दिवशी ‘जाणता राजा’चे छायाचित्र असलेले नेहरू शर्ट, टी शर्ट घातलेले मावळे दिसले तर नवल वाटायला नको...
अंगठीवर शिवाजी महाराज, की-चेनवर राजमुद्रायंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण अंगठ्या आहेत. काळ्या रंगातील या अंगठ्यावर ‘जाणता राजा’ असे प्रिंट केलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र त्यात आहे. १० बोटांमध्ये कोणी छत्रपतींच्या अंगठ्या घातल्या तर आश्चर्य वाटायला नको. यंदाचे आणखी एक आकर्षण म्हणजे जाणता राजाचे फोटो असलेला लॉकेट, ब्रेसलेट व की-चेन आहे. दागिने म्हणूनही त्याचा वापर केला जात आहे. लॉकेट व की-चेनच्या एका बाजूला शिवरायांचा फोटो, तर दुसऱ्या बाजूला ‘राजमुद्रा’ बघण्यास मिळते.
जाणता राजाचा अश्वारूढ पुतळा झेंड्यावरगुजरात राज्य झेंडे बनविण्याचे मोठे ‘हब’ आहे. येथूनच संपूर्ण देशात झेंडे विक्रीला पाठविले जातात. प्रिंट केलेले झेंड्याचे कापड छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आले. त्यास झेंड्याचा आकार देणे व शिवणकाम शहरात केले जात आहे. यंदा शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे प्रिंट असलेले झेंडेही बाजारात आले आहेत, अशी माहिती व्यापारी मयूर झव्हेरी यांनी दिली.
चार लाख झेंडे बाजारात१४ बाय २१ इंचांपासून ते ६० बाय ९० इंचांपर्यंतचे ४ लाख झेंडे बाजारात आले आहेत. त्यात रस्त्यावर, चौकात, गल्लीमध्ये लावण्यासाठी ट्रँगल झेंडेही लक्षवेधी ठरत आहेत. मावळ्याचा फेटा, पगडीही विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच कपड्यांच्या रेडिमेड पताकाही बाजारात दिसत आहेत.