भाजपची भूमिका लक्षात येत नसल्याने शिवसेना अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 16:28 IST2019-08-10T16:23:51+5:302019-08-10T16:28:50+5:30
विधानपरिषद निवडणुकीत दगाफटक्याच्या भीतीमुळे जलील, सत्तार यांची मनधरणी

भाजपची भूमिका लक्षात येत नसल्याने शिवसेना अस्वस्थ
औरंगाबाद : शिवसेना-भाजपमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीसाठी युती होण्याबाबत अजून साशंकता आहे. केंद्रातील राजकारणामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावल्याने युतीचे गणित जुळेल, अशी शक्यता सध्यातरी नाही. अशा परिस्थितीतच औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत भाजपचे मतदार नेमके काय करणार, याचा अंदाज येत नाहीय. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीचे खा. इम्तियाज जलील, आ.अब्दुल सत्तार यांच्याकडील मतदान मिळावे, यासाठी आवाहन केले आहे. गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केला.
भाजपने दोन्ही जिल्ह्यांतील जि. प.तील सत्ता समीकरणाचे हत्यार उपसले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती तोडावी, अशी भाजपची मागणी आहे. या सुडाच्या राजकारणात भाजप काहीही निर्णय घेऊ शकतो, त्यामुळे शिवसेनेने सर्व बाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांत संयुक्त बैठक घेत घोडेबाजार रोखण्यासाठी एकत्रित निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मतदानासाठी ‘फुल नाही तर फुलाची पाकळी’देखील मतदारांना आता मिळणार नाही, असे बोलले जाऊ लागले आहे.
एमआयएमच्या मनधरणीवर भाजपचे मत
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, भाजप महायुतीचे उमेदवार दानवे यांचा प्रचार करीत आहे. एमआयएमचे सहकार्य घ्या अथवा नका घेऊ, आम्हाला त्याचे काहीही देणे-घेणे नाही. आम्ही आमचे काम करणार, ११ तारखेला १८९ मतदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेचे मत असे
शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले, भाजपला डिवचण्यासाठी मनधरणी केलेली नाही. निवडणूक आहे, महायुतीकडे बहुमत असले तरी उमेदवारासाठी सर्वांना आवाहन करावेच लागेल. निवडणूक ही निवडणुकीच्या सर्वांगाने पाहावी लागते. त्यानुसारच पालकमंत्र्यांनी मतदानासाठी आवाहन केले आहे. भेट घेतली म्हणजे चूक झाली, असा अर्थ होत नाही. शुक्रवारी मनपात युतीच्या मतदारांची संयुक्त बैठक घेतल्याचेही त्यांनी सांगितले.