शिवसेनेत ‘दादा’गिरी
By Admin | Updated: April 21, 2016 00:40 IST2016-04-21T00:04:58+5:302016-04-21T00:40:04+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाईतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागण्यामागे अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या मंडळींकडे जबाबदारी देणे हेच मुख्य कारण आहे

शिवसेनेत ‘दादा’गिरी
औरंगाबाद : सातारा-देवळाईतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागण्यामागे अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या मंडळींकडे जबाबदारी देणे हेच मुख्य कारण आहे या पराभवाचे पक्षप्रमुखालादेखील वाईट वाटले असून, शिवसेनेत जे ‘दादा’ सेनेचे (जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव न घेता) राज्य आले आहे. ते संपुष्टात आल्याशिवाय संघटन मजबूत होणार नसल्याचे मत उपनेते खा. चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
जिल्हाप्रमुखासह सर्व संघटनेत बदल होणे गरजेचे असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फेरबदल करण्याप्रकरणी आपले बोलणे झाले आहे. जि.प.निवडणुकीपूर्वी सर्व फेरबदल होतील. बदल केले तर नाराज भाजपकडे जातील, अशी भीती दाखविली जात आहे; परंतु जे निष्ठावान आहेत ते पक्षासोबत राहतील. जे व्यक्तीनिष्ठा ठेवून पक्षात काम करीत आहेत, ते गेले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी आहे, दादासेना येथे चालणार नाही.
अनेक वर्षांपासून काही पदाधिकारी एकाच पदावर आहेत, त्यामुळे त्यांना सर्व काही सोपे असल्यासारखे वाटत असून ते हवेत आहेत. सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी शिवाजीनगर येथील संघशाखेचे अस्तित्व संपुष्टात आणले. त्यामुळे संघाने सातारा-देवळाईत सेनेला हात दिला. जंजाळ यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देऊ नका,असे जिल्हाप्रमुखाला सांगितले होते. परंतु त्यांनी जंजाळ यांना प्रचारासाठी लेखी पत्र देऊन टाकले. मित्रपक्ष आमचे बोट धरून येथे आला आणि आता आमच्या पुढे निघाला आहे. संघटनेवरील पकड कमी होत असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.
सातारा-देवळाई पराभवामुळे सेनेत अंतर्गत वाद विकोपाला गेले असून आगामी काळात संघटनेत काही बदल होतात की, जे चालले आहे ते बरे चालले आहे. अशी भूमिका राहणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावत खैरे म्हणाले, सातारा-देवळाईत मोठ-मोठी भाषणे केली, काय परिणाम झाला. वैचारिक भाषणांची गरज आहे. त्याआधारे निवडणुका जिंकता येतात. आतापासून लोकसभेची तयारी करावी लागणार आहे. उमेदवार कुणीही असो, परंतु नियोजन करावे लागेल. उमेदवारीसाठी आतापासूनच अनेकांना स्वप्न पडू लागले आहेत. उमेदवार पक्षप्रमुखच ठरवतील. सामूहिक विवाह सोहळ्यात दलित, मुस्लिम समाजालादेखील सेनेने सोबत घेतले. परंतु त्याचा काहीही परिणाम सातारा-देवळाईच्या निवडणुकीवर झाला नाही. अशी खंतही खा. खैरे यांनी व्यक्त केली.