Shiv Jayanti: ‘जय भवानी, जय शिवराय’च्या गर्जनेने दुमदुमले अवघे छत्रपती संभाजीनगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:45 IST2025-02-20T14:42:49+5:302025-02-20T14:45:01+5:30

शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्तांची दिवसभर क्रांती चौकात गर्दी

Shiv Jayanti: Chhatrapati Sambhajinagar reverberated with the roar of ‘Jai Bhavani, Jai Shivaji’ | Shiv Jayanti: ‘जय भवानी, जय शिवराय’च्या गर्जनेने दुमदुमले अवघे छत्रपती संभाजीनगर

Shiv Jayanti: ‘जय भवानी, जय शिवराय’च्या गर्जनेने दुमदुमले अवघे छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी संपूर्ण शहर आनंदोत्सवात न्हाऊन निघाले. जन्मोत्सवानिमित्त बच्चे कंपनींनी सायकलला भगवे झेंडे बांधून तर मोठ्यांनी वाहन रॅली, मिरवणुका काढून शिवबांचा केलेल्या जयजयकाराने अवघे शहर दुमदुमले. क्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत लाखो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा, सर्व जाती, धर्मातील व्यक्तीसाठी सण असतो. शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी अवघे शहरवासीय गेले ३६ तास क्रांती चौकात एकवटले होते. यात तरुण, तरुणींची संख्या सर्वाधिक होती. नऊवारी साडी आणि नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, पारंपरिक वेशभूषेतील या तरुणी आधुनिक काळा चष्मा घालून शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. उस्मानपुऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्टेज लावले होते. तर पूर्वेकडे जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचा मंच होता. पश्चिमेला अरुण पाटील हिवाळे यांचा मंच होता. चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ उंच पुतळ्याला पुष्पहार घालणे शक्य नाही. त्यामुळे या पुतळ्याच्या पायथ्याशी शिवरायांचे दुसरे शिल्प ठेवण्यात आले होते. या शिल्पाला तसेच शिवजयंती उत्सव समितीच्या मंचाजवळच महाराजांच्या दुसऱ्या शिल्पासमोर शिवप्रेमी नतमस्तक होत होते.

विद्युत रोषणाईने क्रांती चौक लकाकला
शिवजयंतीनिमित्त क्रांती चौकात महापालिकेने विद्युत रोषणाई केली होती. या रोषणाईमुळे क्रांती चौकात लख्ख प्रकाश पडला होता.

लहान बालकांना शिवरायांची वेशभूषा
क्रांती चौकात अभिवादनासाठी येणाऱ्या मोठ्यांसाेबत लहान मुला-मुलींचाही समावेश होता. ही शेकडो चिमुकली शिवरायांच्या वेशभूषा करून आल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई
क्रांती चौकाच्या चारही बाजूने विविध समित्यांचे स्टेज होते. या स्टेजवरील डीजेवर शिवरायांचा जयजयकार करणारी गीते वाजत होती व त्यावर शिवप्रेमी थिरकत होते. नाचणाऱ्या या तरुण, तरुणींच्या हातात शिवाजी महाराजांचे छायाचित्र होते, तर काहींकडे मनोज जरांगे-पाटील यांचे छायाचित्र होते. ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’ या गर्जनेने क्रांती चौक ३६ तास दुमदुमत होता.

क्रांती चौकात मोठा बंदोबस्त
क्रांती चौकाच्या चारही मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता शहर पोलिसांनी तेथे मोठा बंदोबस्त ठेवला होता. क्रांती चौकाकडे जाणारे सर्व रस्ते अर्धा किलोमीटर दूरच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले होते.

सकाळी ध्वजारोहण, अभिवादन
शिवजन्मोत्सवानिमित्त बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, खा. संदीपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक-अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांती चौकात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Web Title: Shiv Jayanti: Chhatrapati Sambhajinagar reverberated with the roar of ‘Jai Bhavani, Jai Shivaji’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.