इच्छुकांना दे धक्का; शिरीष बोराळकर औरंगाबाद भाजपचे नवे शहराध्यक्ष
By विकास राऊत | Updated: November 10, 2022 19:59 IST2022-11-10T19:58:57+5:302022-11-10T19:59:38+5:30
स्पर्धेतील नावांवर मंत्री, आमदार व नेत्यांत सुरू असलेली ओढाताण एकमत न होण्यापर्यंत गेली आणि बोराळकर यांची लॉटरी लागली.

इच्छुकांना दे धक्का; शिरीष बोराळकर औरंगाबाद भाजपचे नवे शहराध्यक्ष
औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी मर्जीतील व्यक्ती नियुक्त करण्यासाठीचा शोध बुधवारी अनपेक्षितरीत्या संपला. पक्षाने सगळ्या स्पर्धेतील इच्छुकांना धक्का देत, शिरीष बाेराळकर यांना शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केल्याने लाॅबिंगसाठी केलेल्या इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फेरले.
स्पर्धेतील नावांवर मंत्री, आमदार व नेत्यांत सुरू असलेली ओढाताण एकमत न होण्यापर्यंत गेली आणि बोराळकर यांची लॉटरी लागली. प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा फायदा घेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत बोराळकर यांच्या नावासाठी जोर लावल्याची चर्चा भाजपत आहे. बोराळकर यांनी दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. प्रदेश प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम केले. शहराध्यक्षपद दिल्याने त्यांची पदोन्नती की पदावनती, यावरून पक्षात चर्चा आहे. सुमारे तीन दशकांपासून ते भाजपात सक्रिय आहेत.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी माजी नगरसेवक समीर राजूरकर यांचे, सहकारमंत्री अतुल सावे यांनी शिवाजी दांडगे यांचे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आ.हरिभाऊ बागडे यांनी राजू शिंदे, प्रमोद राठोड यांची नावे पुढे केली होती. राजूरकर यांच्यासाठी डॉ.कराड, संघटनमंत्री कौडगे सकारात्मक होते, परंतु पक्षातील इतर विरोधात होते. शिंदे यांचे नाव नक्की झाले होते, परंतु दोन मंत्र्यांमध्ये त्यांच्या नावावरून घालमेल सुरू होती. राठोड यांना भाजपतील एका फळीने उघडपणे विरोध केला. किशोर शितोळेही गुडघ्याला बाशिंग बांधून हाेते. सोशल मीडियाच्या सर्व्हेत ते आघाडीवर होते, परंतु भाजपत असा प्रकार खपवून घेतला जात नाही. दिलीप थोरात, अनिल मकरिये यांची नावे तर नुसती चर्चेपुरतीच राहिली. दोन दशकांत खुल्या व दलित पदाधिकाऱ्याला संधी मिळाली नव्हती. यावेळी खुल्या प्रवर्गाने बाजी मारली.
सर्व्हे, मागणीपत्रांची दखल नाही
अनुसूचित जाती-जमाती मोर्चा आघाडीचे प्रदेश पदाधिकारी जालिंदर शेंडगे यांनी शहराध्यक्षपदी संधी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे पक्षश्रेष्ठीकडे केली होती, तर शिंदे, राजूरकर, शितोळे यांचे नावे सर्व्हेमध्ये चर्चेत असल्याचे साेशल मीडियात व्हायरल झाले होते, परंतु ही सगळीच नावे बाजूला पडली. मंत्र्यांमधील घालमेल बोराळकरांच्या पथ्यावर पडली. सोशल इंजिनीअरिंग, पक्षकार्याचा अनुभव, निष्ठा, मनपा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे धोरण समोर ठेवून बोराळकर यांचे नाव निश्चित केल्याचे बोलले जाते.