शायर शब्बीर पटेल यांची बीडची मैफील ठरली शेवटची

By Admin | Updated: August 19, 2014 02:12 IST2014-08-18T00:18:08+5:302014-08-19T02:12:01+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड ‘‘आओ हिसाब करते है, हमने तुमे क्या दिया’’ या शायरीने समारोप करत शुक्रवारचा कार्यक्रमही थांबला अन् आयुष्यही...जालन्याचे

Shireer Shabbir Patel became the friend of Beed | शायर शब्बीर पटेल यांची बीडची मैफील ठरली शेवटची

शायर शब्बीर पटेल यांची बीडची मैफील ठरली शेवटची




व्यंकटेश वैष्णव , बीड
‘‘आओ हिसाब करते है,
हमने तुमे क्या दिया’’
या शायरीने समारोप करत शुक्रवारचा कार्यक्रमही थांबला अन् आयुष्यही...जालन्याचे जेष्ठ शायर प्रा. शब्बीर पटेल हे शुक्रवारी शायरीच्या कार्यक्रमानिमित्त बीडला आले होते. कार्यक्रम संपल्यावर जिवलग मित्राकडे गेलेले पटेल यांचे शनिवारी पहाटे निधन झाले़
शहरातील बज्मे शमा -ए-अदब यांच्या वतीने १५ आॅगस्टच्या निमित्ताने शायरीचा कार्यक्रम अलहुदा उर्दू शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जालन्याचे प्रसिध्द शायर प्रा. शब्बीर पटेल (वय ६५) यांना निमंत्रित करण्यात आले होते. नियोजित वेळेनुसार शायर पटेल यांनी शुक्रवारी रात्री ९ वाजता शायरीच्या कार्यक्रमाला सुरूवात केली. पटेल मंचावर येताच रसिकांनी त्यांचे टाळ्यांनी स्वागत केले.
शब्बीर पटेलांच्या शायरीने संपूर्ण मराठवाड्याला वेड लावलेले होते. कलावंताच्या आयुष्यात रसिकांच्या टाळ्यांशिवाय मोठे धन काय असू शकते, असे ते सतत रसिकांना संबोधून म्हणायचे. बीड येथे १५ आॅगस्टनिमित्त आयोजित केलेल्या शायरीच्या कार्यक्रमात देखील पटेलांनी धमाल उडवून दिली. आपल्या शायरीतून रसिकाच्या हृदयाचा ठाव घेणारी शायरी केव्हा व कशी सादर करायची याबाबत त्यांचा हातखंडा होता. रंगमंच अन् माईकचा ताबा घेतला की, पटेल यांच्यातल्या शायराचे दर्शन रसिकांना व्हायचे. वय वर्ष ६५ असताना देखील राज्यभरात शायरीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचा प्रवास होत होता. त्यांचे जिवलग मित्र त्यांना नेहमी म्हणत की, आता शायरीचे कार्यक्रम बंद करा, जरा आराम करा, असे कोणी म्हटले की, ते म्हणायचे की, शायरी माझा प्राण आहे. रसिक माझे वैभव आहे. त्यांना मी कधीच डावलू शकत नाही. हे त्यांचे ठरलेले उत्तर असायचे, असे त्यांचे बीडचे जीवलग मित्र माजी नगरसेवक हाफीज ईनामदार म्हणाले़


ज्या शाळेत पटेलांचा शायरीचा कार्यक्रम झाला तेथे बहुसंख्य रसिकांची उपस्थिती होती. शुक्रवारी मध्यरात्री कार्यक्रम संपला. शनिवारी पहाटे प्रा. पटेल यांची हृदयरोगाच्या धक्क्यामुळे प्राणज्योत मालवली. ही बातमी जेव्हा श्रोत्यांना कळली तेव्हा ज्या रसिकांनी रात्री शायर पटेलासांठी टाळ्या वाजवल्या त्याच हातांनी आपले अश्रू पुसल्याचे हृदयद्रावक चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Shireer Shabbir Patel became the friend of Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.