सोयगाव : तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीत शिंदेसेना व उद्धवसेनेच्या संयुक्त पॅनलने १७ पैकी १३ जागा जिंकून वर्चस्व मिळविले असून भाजपाच्या पॅलनलला फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले. कन्नडच्या शिंदेसेनेच्या आ. संजना जाधव यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे.
सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिंदे गटात फुट पडली होती. एका गटाने उद्धव सेनेसोबत पॅनल स्थापन केले होते तर दुसऱ्या गटातील आ. संजना जाधव यांच्या गटाने भाजपासोबत पॅनल स्थापन करून निवडणूक लढविली होती. या संघाच्या निवडणुकीत रविवारी ८८.६० टक्के मतदान झाले होते. सोमवारी शहरात मतमोजणी करण्यात आली. यात उद्धवसेना व शिंदेसेनेच्या संयुक्त पॅनलने १७ पैकी १३ जागांवर विजय संपादन केला. यात उद्धवसेनेने ६, तर शिंदेसेनेने ७ मतदारसंघांतून विजय मिळविला. यात शिंदे गटाचे प्रभाकर दयाळराव काळे (सहकारी संस्था मतदारसंघ), राधेश्याम जगन्नाथ जाधव, रंगनाथ रामदास वराडे (दोघेही वैयक्तिक मतदारसंघ फर्दापूर), गुलाबसिंग देवसिंग पवार (सहकारी संस्था मतदारसंघ फर्दापूर), चंदाबाई शिवदास राजपूत (महिला राखीव मतदारसंघ), भारत बाबूराव तायडे (अनुसूचित जाती / जमाती मतदारसंघ), मोतीराम नारायण तेली (इतर मागासवर्गीय मतदारसंघ), तर उद्धवसेनेचे संजय काशिनाथ निकम, सुभाष अजबराव बोरसे, मुरलीधर वेहेळे (तिन्ही वैयक्तिक मतदारसंघ, बनोटी), भगवान कौतिक लहाने (बिनविरोध सह. संस्था), प्रतिभा धरमसिंग सोळंके (महिला राखीव मतदारसंघ), राजेंद्र पेलाद राठोड (विमुक्त जाती/भटक्या जमाती) हे विजयी झाले.
भाजपच्या पॅनलला फक्त ४ जागाया निवडणुकीत भाजपचे ४ उमेदवार विजयी झाले. यात सुनील अरुण पाटील, मयूर मनगटे, मंगेश सोहनी (तिन्ही, वैयक्तिक मतदारसंघ), तर समाधान बावस्कर (वैयक्तिक मतदारसंघ, फरदापूर) यांचा समावेश आहे.
संजना जाधव गटाचा दारूण पराभवया निवडणुकीत कन्नडच्या शिंदेसेनेच्या आ. संजना जाधव यांच्या गटाचे वैयक्तिक मतदारसंघात तीन उमेदवार उभे होते. या तिन्ही उमेदवारांचा उद्धवसेनेच्या उमेदवारांनी पराभव केला. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. राज्यात सत्ताधारी असतानाही आ. जाधव यांच्या समर्थकांचा येथे दारूण पराभव झाला आहे.