नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:19 IST2018-09-29T14:18:12+5:302018-09-29T14:19:54+5:30
खा. तारिक अन्वर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही : छगन भुजबळ
औरंगाबाद : राफेल घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही. खा. तारिक अन्वर यांनी गैरसमजातून राजीनामा दिलेला दिसतो. त्यांची आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी ते ताज हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काहीही झाले की, क्लीन चिट देऊन मोकळे होण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यांनी सांगितले की, राफेल घोटाळ्याप्रकरणी जेपीसीची मागणी पवार यांनी केली आहे. याचा अर्थ याबाबतीत त्यांनी अपत्यक्षरीत्या शंका व्यक्त केली आहे. मग चौकशी होणार ती पंतप्रधानांची! राज्यातील आगामी राजकीय चित्र काय राहील, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, राष्ट्रवादीतील आपले स्थान, मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी चेहरा या प्रश्नांना भुजबळ यांनी बगल दिली. विधानसभा निवडणुकांच्या वेळी काय होतं ते बघू. एवढेच ते म्हणाले.
शनिवारी भुजबळ यांच्या उपस्थितीत बीड येथे समता मेळावा होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांचे औरंगाबादेत आगमन झाले व रात्री ते एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले. ‘मराठा आरक्षणाबाबत आपले मत काय, असे विचारता ‘ते उद्या’ असे म्हणत भुजबळ उठले.
राष्ट्रवादीने फिरविली पाठ....
छगन भुजबळ यांच्या आगमनाकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कानाडोळा केल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा व शहराचा एकही पदाधिकारी वा प्रमुख कार्यकर्ता विमानतळावर दिसला नाही. गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील व कदीर मौलाना हे मात्र विमानतळावर दिसले. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते का नव्हते, हा चर्चेचा विषय बनला आहे. समता परिषदेचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यातून आलेले दिसले.
वाहन रॅलीने स्वागत....
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळ हे प्रथमच औरंगाबादेत आले. त्यामुळे त्यांचे विशेषत: समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मोठ्या वाहन रॅलीने त्यांन विमानतळ ते ताज हॉटेलपर्यंत आणण्यात आले. विमानतळाच्या बाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली, तसेच ताज हॉटेलच्या बाहेरही. समता परिषदेचे नाव असलेले तिरंगी झेंडे वाहनांवर फडकत होते व जोरदार नारेबाजीही केली जात होती.