कटिंग चहाची लज्जतच न्यारी! ब्रँडच्या जमान्यातही चहाप्रेमी म्हणतात टपरीचाच चहा लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 19:46 IST2025-05-21T19:46:12+5:302025-05-21T19:46:34+5:30

जागतिक चहा दिवस! शहरातील चहाप्रेमी म्हणतात, ब्रँड्स कितीही आले तरी टपरीवरच्या चहाची मजा काही औरच. ती अजूनही टिकून आहे.

Shame on cutting tea! Even in the era of brands, tea lovers say that the taste of tea from the stall is the best! | कटिंग चहाची लज्जतच न्यारी! ब्रँडच्या जमान्यातही चहाप्रेमी म्हणतात टपरीचाच चहा लय भारी!

कटिंग चहाची लज्जतच न्यारी! ब्रँडच्या जमान्यातही चहाप्रेमी म्हणतात टपरीचाच चहा लय भारी!

- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर :
प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या या चहाने हजारो हातांना रोजगारही दिला. शहरात प्रत्येक चौकांत चहाची विविध ब्रँडेड दुकाने दिसतात. मात्र, टपरीवरील वेलची-अद्रक घातलेला मसाला चहाच अनेकांना आकर्षित करतो. ब्रँडेड चहांची अनेक चकचकीत हॉटेल्स असली तरी टपरीवरच्या कटिंग चहाची लज्जतच न्यारी आहे, अशी प्रतिक्रिया चहाप्रेमींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जागतिक चहा दिवस दरवर्षी २१ मे रोजी साजरा केला जातो.

शहरात चहाच्या टपऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कॉलेज, बाजारपेठा याठिकाणी असलेल्या टपऱ्यांवर सतत गर्दी पाहायला मिळते. ब्रँड्स कितीही आले तरी टपरीवरच्या चहाची मजा काही औरच. ती अजूनही टिकून आहे. अलीकडच्या काळात चहाचा व्यवसाय तरुणांना मोठ्या प्रमाणावर खुणावत आहे. मोठ्या संख्येने तरुण या व्यवसायात पदार्पण करत आहेत. अनेकजण नवनव्या कल्पना प्रत्यक्षात आणत आहेत. पण नानाविध अमृततुल्य चहांच्या हॉटेल्स, ग्रीन टी, ब्लॅक टी सोबतच टपरीवरील ‘चाय’ला अनेकांची पसंती आहे.

वडिलांनंतर मुलगा चहा व्यवसायात
वडिलांपासून चालत असलेला चहाचा व्यवसाय योगेश सोनवणे यांनी पुढे नेला. साखरेच्या चहाची जागा गुळाच्या चहाने घेतली. सकाळी सातपूर्वीच चहा बनवण्याची प्रक्रिया ते सुरू करतात. येथे विद्यार्थी, नोकरदार वर्गाची चहा पिण्यासाठी गर्दी होते. दिवसभरात त्यांचा सरासरी एक हजार कप चहा विकला जातो. चहाप्रेमींच्या बळावर गेल्या दहा वर्षांत त्यांनी चहाच्या दोन गाड्या सुरू केल्यात. ‘चकचकीत हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ग्राहक आमच्या चहालाच अधिक पसंती देतात’, असे सोनवणे म्हणाले.

गवती चहालाही पसंती
स्वतंत्र हॉटेलचा व्यवसाय असतानाही मनोज चव्हाण यांनी चहाची टपरी टाकली. घरीच पिकवला जाणारा गवती चहा, ही त्यांच्या चहाची खासियत. त्यांच्या टपरीवरच्या चहाचा सुगंध हा दूरूनच आकर्षित करतो. ‘इतर व्यवसायांना ऋतुमानाचा फटका बसू शकतो. पण आमची चहाची टपरी नेहमीच चहाप्रेमींनी भरलेली असते. ऊन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतूंमध्ये चहाप्रेमी टपरी गाठतातच’, असे चव्हाण यांनी सांगितले.

चहाने दिले नवे आयुष्य
एका अपघातात आलेल्या अपंगत्वानंतर रिक्षाचालक कडुबा वाघ यांना रिक्षा चालवणे अशक्य झाले. त्यानंतर त्यांनी चहाचा गाडा टाकला. स्वच्छता, उत्तम चवीच्या जोरावर अल्पावधीतच टीव्ही सेंटर परिसरात त्यांची टपरी प्रसिद्ध झाली. विद्यार्थी, शिक्षक, बँकर्स, नोकरदार येथे मोठी गर्दी करतात. संकटाशी दोन हात करून पुन्हा एकदा उभे राहिलेल्या कडुबांना चहाने नवे आयुष्यच दिले.

चहाचे विविध प्रकार
कुल्हड, मसाला, चॉकलेट, विलायची चहा
ग्रीन-टी, लेमन टी, ब्लॅक टी, हर्बल टी.

Web Title: Shame on cutting tea! Even in the era of brands, tea lovers say that the taste of tea from the stall is the best!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.