सात जण निलंबित!

By Admin | Updated: December 2, 2014 00:52 IST2014-12-02T00:52:31+5:302014-12-02T00:52:31+5:30

औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची तपासणी करतानाच राज्य समीक्षा पथकातील शिक्षण संचालकांनी घेतलेल्या गुणवत्ता चाचणीत विद्यार्थी नापास झाले.

Seven suspended! | सात जण निलंबित!

सात जण निलंबित!



औरंगाबाद : शालेय पोषण आहाराची तपासणी करतानाच राज्य समीक्षा पथकातील शिक्षण संचालकांनी घेतलेल्या गुणवत्ता चाचणीत विद्यार्थी नापास झाले. एवढेच नव्हे तर सातकुंडच्या शाळेतील गुरुजींना एक वाक्यही धड लिहिता आले नाही. शिक्षणातील ही गुणवत्ता पाहून पथक पुण्याला परतले आणि इकडे संतापलेल्या प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी एक केंद्रप्रमुख, तीन मुख्याध्यापक आणि तीन शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले. सातकुंडच्या शाळेचे मुख्याध्यापक व तीन शिक्षकांचा यात समावेश आहे.
लोहगाव (ता. पैठण)चे केंद्रप्रमुख अशोक बनकर, ढाकेफळ (ता. पैठण) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक एस.बी. चव्हाण, कानडगाव (ता. खुलताबाद) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक बी.टी. चव्हाण, सातकुंड (ता. कन्नड) जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गणपत श्रावण मोरे आणि सहशिक्षक दामू रामचंद्र साळुंके, रामराव अर्जुन सोनवणे आणि संजय रामदास पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले की, शालेय पोषण आहार योजना राबविण्यात केलेली कसूर, गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न व नियोजन नाही, शिक्षकांची शैक्षणिक कामाची तयारी नसणे व स्वच्छतेचा अभाव आदी कारणांमुळे सात जणांना निलंबित करण्यात आले आहे.
पटावरील किमान ८० टक्के विद्यार्थ्यांना एकूण शालेय दिवसाच्या ८० टक्के दिवस खिचडी मिळणे आवश्यक आहे; परंतु औरंगाबाद जिल्ह्यात हे प्रमाण कमी झाल्याने हे पथक तपासणीसाठी आले
होते.
प्राथमिक विभागाचे सहसंचालक गोविंद नांदेडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अपर्णा शेंडकर, युनिसेफच्या अपर्णा देशपांडे, बारामती येथील अधीक्षक शिल्पा मेनन, एसएनडीटी विद्यापीठाच्या आहारतज्ज्ञ श्रीमती नन्नावरे आणि स्थानिक अधिकाऱ्यांपैकी शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे, अन्न व औषधी विभागाचे कासारे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ यांचा समावेश
होता.
दि.२६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पथकाने जिल्ह्यातील २४ शाळांची तपासणी केली. राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने हेदेखील शेवटच्या दिवशी या पथकात सामील झाले होते. ४
शालेय पोषण आहार योजनेतील खिचडी खाण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानातून ताटे खरेदी करण्यात आली आहेत. ही ताटे शाळेतच ठेवणे बंधनकारक आहे; परंतु ढाकेफळ शाळेतील शिक्षकांनी ही ताटे आपापल्या घरी नेल्याचे समितीला दिसून आले. विद्यार्थी घरून आणलेल्या डब्यातच खिचडी खाताना आढळले. ४
सातकुंडच्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गाचे प्रश्न शिक्षण संचालकांनी विचारले; परंतु विद्यार्थ्यांना उत्तरे देता आली नाहीत. वर्गशिक्षकांचे नावही त्यांना लिहिता आले नाही. उपस्थित एका शिक्षकाला या पथकाने ‘मुंबईच्या हल्ल्यात जवान धारातीर्थी पडला’ हे वाक्य लिहिण्यास सांगितले; परंतु शिक्षक ते शुद्ध स्वरूपात लिहू शकले नाहीत. यामुळे शाळेतील शिक्षकांचीच गुणवत्ता पडताळणी झाली, त्यात शिक्षकांची शैक्षणिक तयारी काहीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे उपस्थित तीनही शिक्षक व मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. शाळेचे अन्य दोन शिक्षक रजेवर होते.
दर्जेदार शाळाही
४पिंप्री (ता. सिल्लोड), ममनापूर, देवळाणा, निर्गुडी (ता. खुलताबाद), गुरुधानोरा येथील शाळा दर्जेदार आहेत, असे पथकाला आढळल्या. पिंप्रीच्या शाळेस ग्रामस्थांनी अडीच एकर जागा दान दिली असून, लोकवर्गणीतून त्या जागेला कुंपणही घालून दिले आहे. शाळा व्यवस्थापनाने त्या जागेवर उद्यान फुलविले आहे. उर्वरित शाळांतून गुणवत्ता अभियान योग्य प्रकारे राबविले जात असल्याचे दिसले.

Web Title: Seven suspended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.