बायपासला सर्व्हिस रोड हाच पर्याय; सातारा-देवळाईच्या नागरिकांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 06:47 PM2018-09-06T18:47:39+5:302018-09-06T18:48:12+5:30

अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासन उपाययोजना राबवीत आहे; पण अरुंद रस्ता व त्यावर वाहनांच्या प्रचंड गर्दीने नियोजन विस्कटते.

Service Road bypass in Bypass; Satara-Devlai citizens | बायपासला सर्व्हिस रोड हाच पर्याय; सातारा-देवळाईच्या नागरिकांचा सूर

बायपासला सर्व्हिस रोड हाच पर्याय; सातारा-देवळाईच्या नागरिकांचा सूर

googlenewsNext

 औरंगाबाद : अपघात टाळण्यासाठी बीड बायपासला सर्व्हिस रोड झालाच पाहिजे, वेळकाढू धोरणामुळे मनपा, तसेच जागतिक रस्ते विकास महामंडळावर गुन्हे दाखल करावेत. अपघातातील मृताच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत करून एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी सातारा-देवळाईतील नागरिकांनी बुधवारी बायपासवरील अपघातासंदर्भात आयोजित बैठकीत केली. 

अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासन उपाययोजना राबवीत आहे; पण अरुंद रस्ता व त्यावर वाहनांच्या प्रचंड गर्दीने नियोजन विस्कटते. त्यामुळे बीड बायपासची परिस्थिती किचकट झाली आहे. दर आठवड्याला एकाचा जीव जात आहे. हे अपघातसत्र थांबविण्यासाठी वाहतूक विभागाने जडवाहनांसाठी सकाळी व सायंकाळी केलेल्या प्रायोगिक प्रवेशबंदीत थोडा बदल करून वाहने सिंगल लाईनमध्ये कशी चालतील याकडे बघावे, अशी मागणीही नागरिकांनी केली. 

विरुद्ध दिशेने जाणाऱ्याला सोडून दिले जाते
अपघाताची कारणे शोधण्यासाठी पोलीस नवनवीन प्रयोग करीत आहेत. बुधवारी कोहिनूर हॉल येथे आयोजित बैठकीत सर्वसामान्य नागरिक आले; पण ट्रक, रिक्षा व अवजड वाहनचालक आलेच नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही. सिग्नलवरून दुचाकीस्वार पोलिसांसमक्ष गाडी सुसाट पळवितो, तेव्हा पोलीस बघ्याची भूमिका घेताना दिसतात. हे का, होते असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. त्याचे अनुकरण दुसरी व्यक्ती करते अन् अपघातास कारणीभूत ठरते. त्याकडे  पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे, असा मुद्दाही नागरिकांनी मांडला.

रस्त्यांवरील पार्किंगचे काय
मंगल कार्यालयासमोरील पार्किंगमुळे वाहतूक जाम होते. त्यामुळेदेखील अपघात होत आहेत. आवश्यक ठिकाणी दुभाजक मोकळे करावेत, वळणाची जागा वाढवावी, जेणेकरून वाहन वळविणे सोयीचे ठरेल,  त्याकडेदेखील पोलिसांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही मांडल्या. वाहतुकीसंदर्भातील प्रश्नाचे निराकरण त्वरित केले जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक भारत काकडे, प्रेमसागर चंद्रमोरे आदींची उपस्थिती होती. 

यांनी मांडली मते...
शकील पटेल, गुलाब पटेल, पंकजा माने, पुष्पा जगताप, इमरान पटेल, बद्रीनाथ थोरात, सुनील ठाकरे, सोमीनाथ शिराणे, हकीम पटेल यांच्यासह अन्य नागरिकांनी बैठकीत मते मांडली.

Web Title: Service Road bypass in Bypass; Satara-Devlai citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.