सर्व्हर डाऊन, रेशनचे वांधे; दुकानांवर कार्डधारकांचे हेलपाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:03 IST2024-12-14T16:02:45+5:302024-12-14T16:03:22+5:30
काही दुकानदारांनी व्हॉट्स ग्रुपवरून आज धान्य मिळणार नाही, असे मेसेज टाकल्याने कार्डधारक दुकानावर गेले नाहीत.

सर्व्हर डाऊन, रेशनचे वांधे; दुकानांवर कार्डधारकांचे हेलपाटे
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानात धान्याचा पुरवठा केल्यावर ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे धान्याचे वितरण रखडल्याने कार्डधारकांना शुक्रवारी दुकानांवर हेलपाटे मारावे लागले. तांत्रिक अडचण असल्याचे दुकानदारांनी रेशन कार्डधारकांना सांगितले, परंतु अनेक ठिकाणी दुकानदार आणि रेशन कार्डधारकांमध्ये खटके उडाले. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन वितरणाचे वांधे झाले होते.
रेशन दुकानांवरून प्राधान्य कुटुंब, शेतकरी व दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांना धान्याचे वाटप केले जाते. डिसेंबर महिन्यातील धान्य पुरवठा ७ ते १० तारखेदरम्यान झाला. तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा झालेल्या धान्याची नोंद ‘ई-पाॅस’ यंत्रात झाली नाही. त्यामुळे दुकानदारांना बायोमेट्रिक घेऊन धान्य देण्यात अडचणी आल्या. हा तांत्रिक घोळ १० डिसेंबरला सकाळी दुरुस्त झाला. परंतु, आता सर्व्हर डाऊन असल्याने एका ग्राहकाला धान्य देण्यासाठी ‘ई-पाॅस’ वर थम्ब घेण्यासाठी खूप वेळ लागला. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे राहूनही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. काही दुकानदारांनी व्हॉट्स ग्रुपवरून आज धान्य मिळणार नाही, असे मेसेज टाकल्याने कार्डधारक दुकानावर गेले नाहीत.
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले, तीन दिवसांपासून तांत्रिक अडचण होती. शुक्रवारी सकाळी सर्व्हर सुरळीत सुरू झाले होते. परंतु त्यानंतर पुन्हा सर्व्हर डाऊन झाले. दुपारनंतर सुरळीतपणे धान्यवाटप झाल्याचा दावा त्यांनी केला.