गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

By विकास राऊत | Published: January 19, 2024 11:45 AM2024-01-19T11:45:06+5:302024-01-19T11:45:06+5:30

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले.

Serious issue! Three farmers die every day in Marathwada, the highest number in Beed district | गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

गंभीर मुद्दा! मराठवाड्यात रोज तीन शेतकरी संपवतात जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गंभीर होत असून २०२३ या वर्षात दरमाह ९०, तर रोज ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वर्षभरात १ हजार ८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६९, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८२ आत्महत्या झाल्या. दरम्यान, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांसाठी दिलेला अहवाल सहा महिन्यांपासून अडगळीला पडला आहे.

२०२३ हे वर्ष पूर्णत: अवकाळी पावसाचे, पावसाळ्यात खंडाचे, हिवाळ्यात पावसाळ्याचे असेच गेले. परिणामी खरीप आणि रब्बी हंमागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीचे उत्पादन घटणे, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे २०२३ या वर्षात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे बोलले जाते.

२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले होते. २०२३ मध्ये जानेवारी ते मे या काळातही अवकाळीमुळे पिकांचेही नुकसान झाले. शासन मदतीची घोषणा ऑनलाइनच्या कचाट्यात अडकली. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही. २०२२ मधील सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. गेल्या मान्सूनमध्ये सुमारे दीड महिना पावसाचा खंड पडल्याने उत्पादन घटले. मराठवाड्याची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. ही सगळी कारणे शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरली.

मागील चार वर्षांतील आकडे असे
वर्ष.......शेतकरी आत्महत्या

२०२०...... ७७३
२०२१...... ८८७
२०२२.......१०२२
२०२३......१०८८

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या
जिल्हा............ आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर.. १८२
जालना.......७४
परभणी....१०३
हिंगोली....४२
नांदेड.... १७५
बीड...२६९
लातूर...७२
धाराशीव...१७१
एकूण....१०८८

संवेदनाशून्यतेमुळे हे सगळे घडतेय...
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन सुरू आहे की बंद हे माहिती नाही. राजकीय नेते, प्रशासन संवेदनाशून्य झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या, उपाययोजनांकडे कुणी लक्ष देत नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले जात आहे. त्यांनी काय पिकवावे, कुठे विकावे, महागाईचा त्यांना काय फटका बसतोय, निसर्गाच्या प्रकोपातून ते कसे वाचतील यावर विचार करण्याची कुणाचीही इच्छा दिसत नाही.
- किशोर तिवारी, माजी अध्यक्ष वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

Web Title: Serious issue! Three farmers die every day in Marathwada, the highest number in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.