बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जकात नाक्यावर स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:38+5:302021-01-13T04:09:38+5:30
राज्यात मृत पक्षी आढळल्यास उचित कार्यवाही करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेला पुणे ...

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जकात नाक्यावर स्वतंत्र कक्ष
राज्यात मृत पक्षी आढळल्यास उचित कार्यवाही करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद पालिकेला पुणे येथील पशुसंवर्धन व रोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांकडून खबरदारीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी पालिकेचा आरोग्य विभाग आणि सर्व नऊ प्रभाग अधिकार्यांना खबरदारीच्या सूचना सोमवारी पत्राद्वारे जारी केल्या. याअनुषंगानेच बर्ड फ्लू नियंत्रणासाठी आता पालिकेने बायजीपुरा येथील सेंट्रल नाका परिसरातील पशुचिकित्सालयात स्वतंत्र कंट्रोल रूम स्थापन केली आहे. यासाठी कंट्रोल रूमचे प्रमुख म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.ए. कादरी, पशुधन पर्यवेक्षक शेख शाहेद, मजूर देवनाथ हिंगमिरे, शेख मतीन अशी चार जणांची नियुक्ती केली आहे. पालिकेच्या या कंट्रोल रूमला शहर हद्दीत एखाद्या पक्षाचा असाधारण मृत्यू झाल्याची माहिती कळाल्यास घटनास्थळी जाऊन मृत पक्षाचे नमुने संकलित केले जातील. नंतर संकलित नमुने तपासणीसाठी शहरातील खडकेश्वर येथील पशुचिकित्सालयात पाठवले जातील, अशी माहिती पालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी दिली.