प्राथनास्थळे उघडावीत ही लोकांची भावना; आंदोलन सुरूच ठेवणार : खा. इम्तियाज जलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 14:48 IST2020-09-02T14:43:19+5:302020-09-02T14:48:27+5:30
मशीद उघडण्यास जात असताना खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही काळाने सोडून दिले.

प्राथनास्थळे उघडावीत ही लोकांची भावना; आंदोलन सुरूच ठेवणार : खा. इम्तियाज जलील
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात धार्मिक बंद असलेली मशीद उघडण्यास जात असताना खासदार इम्तीयाज जलील यांना दुपारी १. ३० वाजे दरम्यान पोलिसांनी शाहगंज येथे ताब्यात घेतले. लोकांची भावना ही प्राथनास्थळे उघडावीत अशी आहे. यामुळे आपण मंदिर आणि मशीद उघडण्याचे लोकांना आवाहन केले. मी काल एक मंदिर उघडण्यास गेलो होतो तर आज मशीद उघडण्यास जात होतो असे खा. जलील यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी प्राथनास्थळे का उघडत नाहीत याचे कारण सरकारने सांगावे असा सवाल उपस्थित करत जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असेही सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, यामुळे अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र लग्नासाठी पूर्वी ५० जणांना परवानगी देण्यात येत होती, आता ती २०० पर्यंत वाढविण्यात आली. एसटी बस सुरू करण्यात आली. असे असताना कोरोना आजार फक्त मंदिर आणि मशिदीमधून वाढणार आहे का? असा सवाल खा. जलील राज्य सरकारला केला. कोरोनाचा संसर्ग मंदिर किंवा मशिदीतून होणार नाही तरी आतापर्यंत धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी हिंदू बांधवांनी मंदिर उघडवीत, तर २ सप्टेंबर रोजी आपण स्वत: मशीद उघडणार आहोत, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यापूर्वी दिला होता. बुधवारी ( दि. २) मशीद उघडण्यासाठी जाताना त्यांनी याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, शाहगंज येथील मशिदीसमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान खासदार जलील येथील मशीद उघडण्यासाठी जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर काही वेळाने पोलिसांनी त्यांना सोडून दिले.
आंदोलन सुरूच राहणार
सगळे काही उघडले असताना धार्मिक स्थळे बंद का याचे उत्तर सरकारने द्यावे. धार्मिक स्थळे उघडावीत ही लोकांची भावना आहे. यासाठी मी काम करत आहे. सरकार जोपर्यंत धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत माझे आंदोलन सुरु राहील असे खा. जलील यांनी यावेळी सांगितले.
मंदिर उघडण्यास शिवसैनिकांनी केला विरोध
मंगळवारी ( दि.१ ) खा. जलील यांनी खडकेश्वर येथील महादेव मंदिर उघडण्यास जाणार होते. मात्र यापूर्वीच मंदिराभोवती शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी खा. जलील यांना विरोध केला. यानंतर खा. जलील यांनी मंदिर उघडण्याचा निर्णय रद्द केला.
खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन https://t.co/pVcUvEjOxL
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 2, 2020