ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार; गांधेलीच्या सुपुत्राचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:29 IST2024-12-18T16:28:38+5:302024-12-18T16:29:47+5:30
डॉ. सुधीर रसाळ ९१ व्या वर्षात देखील त्याच उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार; गांधेलीच्या सुपुत्राचा सन्मान
छत्रपती संभाजीनगर: मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना "विंदांचे गद्यरूप" या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला आहे. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी डॉ. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर होताच साहित्य क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.
विचक्षण लेखक आणि वाचनमग्न समीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा असलेले डॉ. सुधीर रसाळ ९१ व्या वर्षात देखील त्याच उत्साहाने साहित्य सेवा करत आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्त आहेत. शतकी वाटचालीकडे निघालेल्या रसाळ सरांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या १६ व्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. त्यांनी संपादित केलेली तीन पुस्तके देखील प्रकाशित आहेत. त्यांना आतापर्यंत २८ नामवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
गांधेलीच्या सुपुत्राची गरुडझेप
रसाळ कुटुंब मूळचे गांधेलीचे. (ता. जि. छत्रपती संभाजीनगर). त्यांच्या वडिलांकडे या गावची पाटीलकी व कुळकर्णीकी होती. सुधीर रसाळ यांचा जन्म १० ऑगस्ट १९३४ रोजी वैजापुरात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योगही त्यांना आला. शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केले. त्यांना समीक्षेसाठी अनेक नामवंत पुरस्कार मिळाले आहेत. यात आता साहित्य अकादमी या मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे.
सर्वोच्च पुरस्काराचा आनंद
यापूर्वी माझ्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच आजवर विविध २८ पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, साहित्य अकादमी हा सर्वोच्च पुरस्कार मी मानतो. तो मला मिळाला याचा आनंद आहे.
- डॉ. सुधीर रसाळ, जेष्ठ समीक्षक
असे आहे पुरस्काराचे स्वरूप
साहित्य अकादमीच्या वतीने वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता देण्यात आली. हे पुरस्कार पुरस्कार १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना यासाठी निवडण्यात आले. येत्या ८ मार्च २०२५ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. ताम्रपट, शाल आणि १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शालेय शिक्षण आणि अध्यापन
डॉ. सुधीर रसाळ यांचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगरातील सरस्वती भुवन येथे तर महाविद्यालयीन शिक्षण मिलिंद महाविद्यालयात झाले. तर त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. ची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'आधुनिक मराठी काव्यातील प्रतिमासृष्टी' या विषयात त्यांना पीएच. डी. पदवी प्रदान केली. त्यानंतर त्यांनी तब्बल ३७ वर्ष अध्यापन क्षेत्रात सेवा दिली. छत्रपती संभाजीनगर येथील गव्हन्मेंट आर्टस् अँड सायन्स कॉलेज येथे तीन वर्ष अधिव्याख्याता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी विभागात येथे अधिव्याख्याता, प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदांवर तब्बल ३४ वर्ष कार्यरत राहत मराठी भाषेचे अध्यापन केले.
डॉ. सुधीर रसाळ यांची साहित्य संपदा:
१) कविता आणि प्रतिमा, मौज प्रकाशन, मुंबई. १९८२.
२) काही मराठी कवी: जाणिवा आणि शैली, आ. ति. जनशक्ती वाचक चळवळ, २०११
३) वाङ्मयीन संस्कृती, मौज प्रकाशन, मुंबई, २०१०
४) ना. घ. देशपांडे यांची कविता, मौज प्रकाशन, मुंबई, २०१०
५) मर्देकरांच्या कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप, मौज प्रकाशन, मुंबई, २०१५
६) मर्डेकरांची कविता: आकलन आणि विश्लेषण, मौज प्रकाशन, मुंबई, २०१५
७) मर्डेकरांचे कथात्म वाड्मय, मौज प्रकाशन, मुंबई, २०१५
८) लोभस (ललित गद्य) राजहंस प्रकाशन, पुणे, २०१६
९) कवितानिरूपणे (समीक्षालेख) विजय प्रकाशन नागपूर, २०१८
१०) भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१८
११) माणसं जिव्हाळ्याची, राजहंस प्रकाशन, पुणे, २०२१
१२) पार्थिवपूजक पु. शि. रेगे, पॉप्युलर प्रकाशन. मुंबई, २०२१
१३) समीक्षा आणि समीक्षक, सायन पब्लिकेशन्स, पुणे २०२१
१४) काव्यालोचना, सायन पब्लिकेशन्स, पुणे २०२१
१५) विदांचे गद्यरूप, राजहंस प्रकाशन, पुणे, २०२२
१६) नव्या वाटा शोधणारे कवी, छत्रपती संभाजीनगर, २०२४
संपादने:
१) साहित्यप्रकार : स्वरूप आणि अध्यापन. (संपादनसाहाय्यक)
२) गंगाधर गाडगिळांची निवडक समीक्षा. (संपादन)
३) दासोपंतविरचित गीतार्णव अठरावा अध्याय. (संपादन)
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आणि पुस्तक
१ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९५५ वैदिक संस्कृतीचा विकास
२ बाळ सीताराम मर्ढेकर १९५६ सौंदर्य आणि साहित्य
३ चिंतामण गणेश कोल्हटकर १९५८ बहुरुपी
४ गजानन त्र्यंबक देशपांडे १९५९ भारतीय साहित्यशास्त्र
५ विष्णू सखाराम खांडेकर १९६० ययाति
६ द.न.गोखले १९६१ डॉ.केतकर
७ पुरुषोत्तम यशवंत देशपांडे १९६२ अनामिकेची चिंतनिका
८ श्रीपाद ना.पेंडसे १९६३ रथचक्र
९ रणजित देसाई १९६४ स्वामी
१० पु.ल.देशपांडे १९६५ व्यक्ति आणि वल्ली
११ त्र्यंबक शंकर शेजवलकर १९६६ श्री.शिवछत्रपति
१२ नारायण गोविंद कालेलकर १९६७ भाषा : इतिहास आणि भूगोल
१३ इरावती कर्वे १९६८ युगान्त
१४ श्रीनिवास नारायण बनहट्टी १९६९ नाट्याचार्य देवल
१५ न. र. फाटक १९७० आदर्श भारत सेवक
१६ दुर्गा भागवत १०७१ पैस
१७ गोदावरी परुळेकर १९७२ जेंव्हा माणूस जागा होतो
१८ गुरुनाथ आ.(जी. ए.) कुलकर्णी १९७३ काजळमाया
१९ वि.वा.शिरवाडकर १९७४ नटसम्राट
२० रा भा. पाटणकर १९७५ सौंदर्य मीमांसा
२१ गो.नी.दांडेकर १९७६ स्मरणगाथा
२२ आत्माराम रावजी देशपांडे १९७७ दशपदी
२३ चिंतामणी त्र्यंबक खानोलकर १९७८ नक्षत्रांचे देणे
२४ शरदचंद्र मुक्तिबोध १९७९ सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य
२५ मंगेश पाडगावकर १९८० सलाम
२६ लक्ष्मण माने १९८१ उपरा
२७ प्रभाकर पाध्ये १९८२ सौंदर्यानुभव
२८ व्यंकटेश माडगूळकर १९८३ सत्तांतर
२९ इंदिरा संत १९८४ गर्भरेशमी
३० विश्राम बेडेकर १९८५ एक झाड आणि दोन पक्षी
३१ ना.घ.देशपांडे १९८६ खूणगाठी
३२ रा.चिं.ढेरे १९८७ श्री विठ्ठल: एक महासमन्वय
३३ लक्ष्मण गायकवाड १९८८ उचल्या
३४ प्रभाकर उर्ध्वरेषे १९८९ हरवलेले दिवस
३५ आनंद यादव १९९० झोंबी
३६ भालचंद्र वनाजी नेमाडे १९९१ टीका स्वयंवर
३७ विश्वास पाटील १९९२ झाडाझडती
३८ विजया राजाध्यक्ष १९९३ मर्ढेकरांची कविता
३९ दिलीप पुरुषोत्तम चित्रे १९९४ एकूण कविता-१
४० नामदेव कांबळे १९९५ राघववेळ
४१ गंगाधर गाडगीळ १९९६ एका मुंगीचे महाभारत
४२ म.वा.धोंड १९९७ ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी
४३ सदानंद मोरे १९९८ तुकाराम दर्शन
४४ रंगनाथ पठारे १९९९ ताम्रपट
४५ ना.धों.महानोर २००० पानझड
४६ राजन गवस २००१ तणकट
४७ महेश एलकुंचवार २००२ युगान्त
४८ त्र्यंबक विनायक सरदेशमुख २००३ डांगोरा एका नगरीचा
४९ सदानंद देशमुख २००४ बारोमास
५० अरुण कोलटकर २००५ भिजकी वही
५१ आशा बगे २००६ भूमी
५२ गो.म.पवार २००७ विठ्ठल रामजी शिंदे:जीवन व कार्य
५३ श्याम मनोहर २००८ उत्सुकतेने मी झोपलो
५४ वसंत आबाजी डहाके २००९ चित्रलिपी (काव्यसंग्रह)
५५ सरोज देशपांडे २०१० अशी काळवेळ (अनुवादित)
५६ कवी ग्रेस २०११ वा-याने हलते रान (ललितलेख)
५७ जयंत पवार २०१२ फिनिक्सच्या राखेतून ऊठला मोर (कथासंग्रह)
शारदा साठे २०१२ पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी (अनुवादित)
५८ सतीश काळसेकर २०१३ वाचणा-याची रोजनिशी
५९ जयंत नारळीकर २०१४ चार नगरातले माझे विश्व (आत्मचरित्र)