‘घृष्णेश्वर’ दर्शनासाठी अर्धवस्त्र योग्यच
By Admin | Updated: July 27, 2014 01:19 IST2014-07-27T00:58:31+5:302014-07-27T01:19:32+5:30
वेरूळ : येथील श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी अर्धवस्त्राची जी परंपरा चालू आहे, ती योग्यच आहे.

‘घृष्णेश्वर’ दर्शनासाठी अर्धवस्त्र योग्यच
वेरूळ : येथील श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी अर्धवस्त्राची जी परंपरा चालू आहे, ती योग्यच आहे. यात बदल केल्यास वारकरी संप्रदाय, साधू-संत आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, अशी माहिती शनिवारी महामंडलेश्वर प.पू. शांतीगिरी महाराज व वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष आपेगाव निवासी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यांनी येथील बैठकीत दिली.
वेरूळ येथे आज धर्मसंस्कार सोहळा नियोजन बैठकीचे आयोजन शांतीगिरी महाराजांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या बैठकीत अर्धवस्त्राचा मुद्दा चर्चिला गेला. घृष्णेश्वर मंदिरात जी परंपरा चालू आहे, तिला धर्माचा निश्चितच आधार आहे. धर्माच्या आधाराशिवाय परंपरा हिंदू धर्मात प्रचलित नाहीत. त्यामुळे श्रद्धा असणाऱ्यांनी अर्धवस्त्रानेच घृष्णेश्वरांचे दर्शन घ्यावे. अर्धवस्त्राची महतीही महाराजांनी सांगून यापुढेही हीच परंपरा घृष्णेश्वर मंदिरात कायम ठेवण्याचे आवाहन केले. पावित्र्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही म्हणून अर्धवस्त्राने दर्शन घेतल्यास वायूस्नानही होते, असे ते म्हणाले.
दारूबंदी व कत्तलखाने बंद करा
दि. ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या काळात होणाऱ्या धर्मसंस्कार सोहळ्यात आपण महाराष्ट्रातील कत्तलखाने बंद करून दारूबंदी करण्याचा संकल्प सर्व अनुयायांना करायला लावणार आहे, असे शांतीगिरी महाराजांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीस तहसीलदार बालाजी शेवाळे, राजेंद्र पवार, झुंबर मोडके, शिवा अंगूलकर, वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी, सोहळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)