जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडीसाठी सत्तासंघर्ष

By Admin | Updated: July 6, 2014 00:13 IST2014-07-05T23:57:21+5:302014-07-06T00:13:27+5:30

सतीश जोशी, परभणी परभणी जिल्ह्यातील सात पालिकांच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ११ जुलै रोजी या निवडी होत

Selection of municipal corporation in the district | जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडीसाठी सत्तासंघर्ष

जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडीसाठी सत्तासंघर्ष

सतीश जोशी, परभणी
परभणी जिल्ह्यातील सात पालिकांच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ११ जुलै रोजी या निवडी होत असल्या तरी त्यापूर्वीच यानिमित्ताने पालिका क्षेत्रात सत्तासंघर्ष घडत आहे़
जिंतूर वगळता गंगाखेड, पाथरी, मानवत, सेलू, सोनपेठ, पूर्णा या पालिकांच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची मुदत २० जून रोजी संपली होती़ जिंतूरची मुदत २७ रोजी संपली़ राज्यातील मुदत संपलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या निवडी लांबणीवर पडल्या होत्या़ या निर्णयास काही जणांनी आक्षेप घेतल्यामुळे दिलेली मुदतवाढ रद्द करून या निवडी आता होत आहेत़ पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी संदर्भात संख्याबळ टिकविण्यासाठी जिल्ह्यात सत्तांसघर्ष एक महिन्यापूर्वीच सुरू झाला होता़ विशेषत: गंगाखेडमध्ये माजी नगराध्यक्ष डॉ़ मधुसूदन केंद्रे आणि विद्यमान नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्यातील संघर्षाने उचलच खाल्ली नाही तर दोघांतील वाद पोलिस ठाणे, कोर्ट कचेऱ्यापर्यंत गेला़ गंगाखेडमध्ये २३ नगरसेवक असून, त्यापैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेस ४, भाजपा ५, शिवसेना २, घनदाट मित्रमंडळ आणि अपक्ष प्रत्येकी १ असे बलाबल आहे़ हे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे़
गंगाखेडनंतर सेलू पालिकेत आ़ रामप्रसाद बोर्डीकर विरूद्ध माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यातील सत्तासंघर्ष उफाळत आहे़ सेलूचे नगराध्यक्षपद ओबीसीसाठी सुटले आहे़ सेलूत काँग्रेसचे १४, शिवसेनेचे ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला़ या निवडीच्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरेल़ मानवतमध्ये काँग्रेसची बाजू भक्कम असून, नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़ जिंतूरमध्येही नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी सुटले आहे़ जिंतूरमध्ये काँग्रेसचे ११ तर राष्ट्रवादीचे ९ आणि माजी आ़ कुंडलिक नागरे यांच्या गटाचा १ नगरसेवक निवडून आला आहे़ सोनपेठमध्ये नगराध्यक्षपद मागासवर्गीयसाठी राखीव झाले आहे़ या पालिकेत २ सदस्य मागासवर्गीय होते़ यापैकी एक काँग्रेसकडे तर दुसरा राष्ट्रवादीकडे होता़ १७ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे ९ आणि राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले होते़ पैकी काँग्रेसच्या २ सदस्यांनी वेगळी चूल मांडली होती़ त्यापैकी नगराध्यक्षपदाचे दावेदार असलेले सदस्य विजयमाला सिरसाठ यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले आहे़ त्यामुळे नगराध्यक्षाची निवडणूक बिनविरोध होणार आहे़
पाथरीमध्येही आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्याच ताब्यात पालिका असल्यामुळे ते सांगतील तो उमेदवार नगराध्यक्ष बनणार आहे़ हे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़ पूर्णेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम आहे़ या पालिकेत राष्ट्रवादीचे १०, भारिप - बहुजन ३, अपक्ष ३, शिवसेना २ आणि बसपाचा एक उमेदवार निवडून आला़ हे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या निवडी होत असल्यामुळे या निवडींना महत्त्व प्राप्त झाले आहे़ गेल्या महिन्यापासूनच गंगाखेड, सोनपेठ, सेलू, पूर्णा या ठिकाणचे काही नगरसेवक सुरक्षित ठिकाणी सहलीवर गेले आहेत़
असा असेल निवडणूक कार्यक्रम
नगराध्यक्षपदासाठी ७ आणि ८ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील़ ८ रोजी दुपारी २ नंतर छाननी होऊन यादी जाहीर होईल़ १० जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील़ ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या निवडी होतील़ नगराध्यक्षांच्या निवडीनंतर उपनगराध्यक्षांच्या निवडी ११ जुलै रोजीच होणार आहेत़

Web Title: Selection of municipal corporation in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.