जिल्हाधिकाऱ्यांकडील जप्तीची कारवाई दुसऱ्यांदा टळली
By Admin | Updated: January 21, 2015 01:07 IST2015-01-21T00:55:30+5:302015-01-21T01:07:36+5:30
जालना : पाझर तलावाचा मावेजा न मिळाल्याने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जालना यांची खूर्ची, टेबल व गाडी जप्त करण्यास गेलेल्या पथकास मार्च

जिल्हाधिकाऱ्यांकडील जप्तीची कारवाई दुसऱ्यांदा टळली
जालना : पाझर तलावाचा मावेजा न मिळाल्याने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी जालना यांची खूर्ची, टेबल व गाडी जप्त करण्यास गेलेल्या पथकास मार्च महिन्यापर्यंत मावेजा देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन मिळाल्याने या जप्तीची कारवाई तुर्तास टळली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडील अशा प्रकारची कारवाई टळल्याचा गेल्या चार महिन्यातील हा दुसरा प्रसंग आहे.
मौजे रामगव्हाण येथील शेतकरी अर्जुन, प्रभू, रशिदाबी व अन्य शेतकऱ्यांनी पाझर तलावास वाढीव मावेजा न दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यासह लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता जि.प. जालना यांच्याविरुद्ध दाखल केलेली आहे. मावेजाची रक्कम न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी अॅड. सुरेश कुलकर्णी यांच्यामार्फत येथील न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने जिल्हाधिकारी यांची खूर्ची, टेबल व गाडी जप्त करण्याचे आदेश दिले.
या आदेशाची प्रत घेऊन २० जानेवारी रोजी अॅड. कुलकर्णी, बेलिफ काळे आणि संबंधित शेतकरी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे जिल्हाधिकारी नायक यांनी त्यांच्याशी चर्चा केली. संबंधित शेतकऱ्यांना मावेजाची रक्कम मार्च २०१५ पर्यंत किंवा तत्पूर्वी येत्या १५ दिवसांत देण्याची व्यवस्था करतो, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सदरील रक्कम शेतकऱ्यांना घरपोच देण्याची व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडील जप्तीची कारवाई टळली आहे.
यापूर्वी देखील नोव्हेंबर महिन्यात मावेजा न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये अॅड. संजय काळबांडे यांच्यासह बेलिफ व संबंधित शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची खूर्ची, गाडी जप्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना आश्वासन देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई टाळली होती. (प्रतिनिधी)