अंगावरील हळद उतरली नाही तोच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 15:42 IST2019-03-06T15:40:44+5:302019-03-06T15:42:28+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

अंगावरील हळद उतरली नाही तोच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युवकाची आत्महत्या
औरंगाबाद: लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात समोर आली. जीवन सोनाजी भोसले असे मृत युवकाचे नाव आहे. अंगावरील हळद उतरली नाही तोच युवकाने जीवनयात्रा संपवाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन सोनाजी भोसले हा समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर होता. मंगळवारी दुपारी कचनेर येथे रुपाली घोरपडे सोबत त्याचा विवाह झाला. लग्नानंतर संध्याकाळी सर्वजण ब्रिजवाडी येथील आपल्या घरी आले. यानंतर आज पहाटे तो झोपेतून उठला आणि वडिलांजवळ जाऊन बसला. थोड्यावेळाने ६ वाजेच्या सुमारास दुचाकीवर जीवन घराबाहेर पडला. रेल्वेस्टेशन परिसरात आला. याच एक पॅसेंजर रेल्वे स्थानकाकडे येत असल्याचे पाहून त्याने त्याच्या समोर उडी घेतली. दरम्यान, बराच वेळ झाल्यानंतरही जीवन घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. यावेळी काहीजणांनी तो मुकुंदवाडीकडे गेल्याचे सांगितले. नातेवाईकांनी या परिसरात शोध घेतला असता त्याची गाडी रेल्वे पटरीजवळ आढळून आली. काही अंतरावर रेल्वेपटरीवर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जीवनला समाजकार्याची आवड होती. तो ब्रिजवाडी परिसरातील सर्व सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेत असे. लग्नाला एक दिवसही झालेला नसताना त्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.