खाजगी जागेत भरतेय शाळा

By Admin | Updated: August 2, 2014 01:32 IST2014-08-02T00:18:36+5:302014-08-02T01:32:14+5:30

विठ्ठल भिसे, पाथरी शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने २००८ साली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू केले़

Schools filled in private space | खाजगी जागेत भरतेय शाळा

खाजगी जागेत भरतेय शाळा

विठ्ठल भिसे, पाथरी
शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने २००८ साली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू केले़ निवासी स्वरुपाच्या या विद्यालयासाठी शासनाकडून निधीही मंजूर करण्यात आला आहे़
पाथरी तालुक्यातील या विद्यालयासाठी सहा वर्षांपासून जागेचा वाद न सुटल्याने हे वसतिगृह भाड्याच्या जागेमध्ये सुरू आहे़ १ एप्रिलपासून तर शासनाने जागेचे भाडेच रद्द केल्यामुळे वसतिगृह चालवावे, कसे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे़ या विद्यालयात १५० विद्यार्थिनी राहत असून त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे़ ६ ते १४ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच अर्धवट शिक्षण झालेल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाने राज्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय निवासी स्वरुपात सुरू करण्याचा निर्णय घेतला़ परभणी जिल्ह्यात ९ ठिकाणी हे कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू झाले़ इमारत आणि निवासस्थानासाठी शासनाने मोठ्या निधीची तरतूरही केली़ परंतु, पाथरी येथे २००८ साली मंजूर झालेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला जागा मिळाली़ त्यानंतर माळीवाडा शिवारात सर्वे नंबर ६७/५ मध्ये वसतिगृहाचे कामही सुरू झाले़ काम अर्धवट अवस्थेत आल्यानंतर या प्रकरणी गंगाखेड न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले़ माळीवाडा शिवारामधील जी जागा ताब्यात देण्यात आली त्या जागेऐवजी सर्वे नंबर ६७/११ मध्ये बांधकाम केल्याचे निदर्शनास आले़ यामुळे बांधकाम मागील तीन वर्षांपासून पूर्णत: रखडून पडले़ गंगाखेड न्यायालयाच्या निर्णयानंतर जागेचा प्रश्न मार्गी लागेल असे दिसत असताना माळीवाडा सर्वे नंबर ६७ ची शासनस्तरावरून चौकशी सुरू झाल्यामुळे हे बांधकाम पुन्हा रखडत पडले आहे़ यामुळे गेल्या सहा वर्षांपासून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एका खाजगी इमारतीमध्ये सुरू असल्याने या विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची निवासस्थानाची आणि शिक्षणाची हेळसांड मात्र सुरू आहे़
सुविधांचा अभाव
खाजगी जागेत सुरू असलेल्या विद्यालयामध्ये आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळाबाह्य १०० मुली आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत नववी ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील २५ प्रमाणे ५० मुली अशा १५० मुली या विद्यालयामध्ये निवासी स्वरुपाचे शिक्षण घेत आहेत. इमारत आणि निवासस्थानाची सोय नसल्यामुळे सुविधांचा मात्र या ठिकाणी अभाव असल्याचे दिसते.
१० लाखांचा निधी खर्च
माळीवाडा शिवारातील या शाळेला उपलब्ध झालेल्या जागेवर १० लाख रुपयांचा निधी खर्च करून इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले़ त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले़ यामुळे शासनाच्या निधीतून सुरू असलेले बांधकाम अर्धवट अवस्थेत राहिल्याने या ठिकाणी इमारतीचा सांगडा दिसून येत आहे़
भाडे बंद झाल्याने प्रशासन अडचणीत
कस्तुरबा गांधी विद्यालयासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला खरा़ परंतु, जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील विद्यालय खाजगी जागेत भाडेतत्त्वावर सुरू आहे़ परंतु, शासनाने १ एप्रिलपासून या विद्यालयाच्या खाजगी जागेचे भाडे देणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन अडचणीत सापडले आहे़

Web Title: Schools filled in private space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.