सिडकोच्या पाण्यावर जगतात शाळेची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:42 IST2016-06-02T23:27:43+5:302016-06-02T23:42:15+5:30
आॅर्चिड इंग्लिश स्कूल सिडको जलवाहिनीच्या पाण्यावर डल्ला मारून हे पाणी शाळेतील झाडांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सिडकोच्या पाण्यावर जगतात शाळेची झाडे
वाळूज महानगर : एकीकडे सिडको वाळूज महानगरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू असताना दुसरीकडे आॅर्चिड इंग्लिश स्कूल सिडको जलवाहिनीच्या पाण्यावर डल्ला मारून हे पाणी शाळेतील झाडांना देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सिडको जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. गळती असलेल्या काही ठिकाणी प्रशासनाने पक्षी व जनावरांची तहान भागावी यासाठी हौद बांधले आहेत. परंतु या गळतीचा काही जण गैरफायदा घेत आहेत. आॅर्चिड इंग्लिश स्कूलने तर हद्दच केली आहे. शाळेच्या गेटजवळ जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती आहे. व्हॉल्व्हवर झाडेझुडपे वाढल्याने गळती असल्याचे सहज लक्षात येत नाही. त्यामुळे या व्हॉल्व्हला छेडछाड करून गळती मोठी करण्यात आली आहे.
या गळतीतून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे पाणी आॅर्चिड स्कूलने थर्माकोल व प्लास्टिक बाटलीच्या साह्याने शाळेच्या आतील बाजूस वळविले आहे. विशेष म्हणजे पाण्याची गळती दिसू नये म्हणून शाळेने गळतीच्या बाजूला झाडांच्या फांद्या व हिरव्या रंगाची जाळी लावलेली आहे.
वळते केलेले सिडकोचे पाणी गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील झाडांना दिले जाते. फुकटचे पाणी मिळत असल्याने शाळेकडून झाडांसाठी मुबलक पाण्याचा वापर केला जात असल्याने शाळेतील झाडांचे वाफे कायम पाण्याने तुडुंब भरलेले दिसतात. तसेच या पाण्याचा वापर मैदानावर मारण्यासाठी व अन्य इतर कामांसाठीही केला जात असल्याचे काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सिडको प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे सिडको परिसरातील नागरिकांना आठवड्यातून केवळ दोनदा; तेही कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.