लोकसहभागातून फुलविला शाळेचा परिसर
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-24T23:57:02+5:302014-06-25T01:04:00+5:30
मोहनदास साखरे , मांडवा ‘अख्ख गाव एकवटलं अन् शाळाचं रुपडच पालटल’ या वाक्याचा प्रत्यय अनुभवयास आला तो परळी तालुक्यातील टोकवाडी या ग्रामीण भागातील ४०० विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेत.

लोकसहभागातून फुलविला शाळेचा परिसर
मोहनदास साखरे , मांडवा
‘अख्ख गाव एकवटलं अन् शाळाचं रुपडच पालटल’ या वाक्याचा प्रत्यय अनुभवयास आला तो परळी तालुक्यातील टोकवाडी या ग्रामीण भागातील ४०० विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेत. ग्रामस्थांनी १ लाख रुपयांची मदत करीत व लोकसहभागातून शाळेच्या परिसरात रंगीबेरंगी फुलांचा बगीचा फुलविला आहे. टोकवाडी ग्रामस्थांचा हा आदर्श खरोखरच इतर शाळांनी घेण्यासारखा आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी ‘स्पॉट रिपोर्टींग’ करुन घेतलेला हा आढावा.
परळी तालुक्यातील टोकवाडी गावात अवघी ५ हजार लोकसंख्या आहे. एवढी लोकसंख्या असतानाही या गावात लोकांची एकजूट व सामंजस्य यामुळे या गावाचं नाव परिचित आहे. या गावांमध्ये व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी, धार्मिक वृत्ती यासारख्या विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले लोक राहतात. कुठलेही सामाजिक कार्य करायचे असले की गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आणि काम यशस्वीरीत्या पार पाडतात. असाच एक स्तुत्य उपक्रम टोकवाडी ग्रामस्थांनी राबविला आहे.
अडीच महिन्याचा सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट होऊ लागला. शाळेचा परिसर चिमुकल्यांच्या गर्दीने फुलून गेला. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी १०० रुपयांपासून ते हजार रुपये याप्रमाणे रक्कम गोळा करुन शाळेच्या परिसरात बगीचा फुलविण्याचा उपक्रम हाती घेतला. याला गावकऱ्यांची एकी असल्यामुळे सर्वांचा होकार मिळाला. रक्कम देऊनही काही ग्रामस्थांनी विटा, वाळू, काळी माती, सिमेंट आदी साहित्य दिले. तसेच काही ग्रामस्थांनी शाळेच्या परिसरात लावण्यासाठी फूल झाडांची रोपे दिली. चिमुकल्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच शाळेच्या परिसरात फुलांची झाडे लावताना मदत केली. कोणीही काम करताना कमीपणा वाटू दिला नाही. मोठ्या उत्साहाने आपले पाल्य प्रसन्न वातावरणात कसे राहतील ? यासाठी येथील ग्रामस्थांनी परिसरात बगीचा फुलविला. या शाळेत १५ शिक्षक संख्या असून, पहिली ते सातवीपर्यंत चारशे ते साडेचारशे विद्यार्थी संख्या आहे. मुख्याध्यापक अशोक निलेवाड यांनी ग्रामस्थांचे काम पाहून आभार व्यक्त केले. बालासाहेब मुंडे, उपसरपंच बालाजी मुंडे, डॉ. राजाराम मुंडे, पप्पू मुंडे, गोपीनाथ चौगुले, रुक्मिणी आघाव आदी ग्रामस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने शाळेच्या परिसरात व शाळेच्या भिंतीवर रंगरंगोटी, चित्रे काढून शाळेचा परिसर सुशोभित करण्यासाठी ग्रामस्थांकडून निधी गोळा केला. टोकवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून राबविलेला उपक्रम स्तुत्य असून, याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.