‘यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ हवी’
By Admin | Updated: September 28, 2016 00:45 IST2016-09-28T00:25:24+5:302016-09-28T00:45:36+5:30
औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी

‘यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ हवी’
औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी कामगार आणि कौशल्य विकासमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आ. चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई येथे संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. सुशिक्षित बेरोजगार पदवीधर उमेदवारांनी शासन निर्णयानुसार अंशकालीन कर्मचारी म्हणून तहसीलदारांच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षे केवळ तीनशे रुपये मानधनावर काम केलेले आहे.
अशा अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत व डाटाबेस तयार करण्यासाठी औरंगाबाद येथील कौशल्य विकास सहायक संचालकांनी जाहिरात देऊन अंशकालीन कर्मचाऱ्यांनी शपथपत्र व इतर आवश्यक ती कागदपत्रे १४ जुलै २०१६ पर्यंत सादर करण्यास कळविले होते. मात्र अनेक सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी सदरील जाहिरात पाहिली नसल्यामुळे ते मुदतीत नोंद करू शकले नाहीत. त्यामुळे यादी अद्ययावत करण्यासाठी अजून ६० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे. मुदतवाढीसाठी लवकरच आदेश दिले जातील, असे निलंगेकर यांनी स्पष्ट केल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.