सावरगाव ग्रामस्थांनी पकडला चोरटा
By Admin | Updated: January 18, 2015 00:29 IST2015-01-18T00:24:52+5:302015-01-18T00:29:06+5:30
तामलवाडी : चोरी करून पोबारा होण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला़ त्याच्याकडून दहा हजार रूपये जप्त करण्यात आले असून,

सावरगाव ग्रामस्थांनी पकडला चोरटा
तामलवाडी : चोरी करून पोबारा होण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप दिला़ त्याच्याकडून दहा हजार रूपये जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास सावरगाव (ता़तुळजापूर) येथे घडली़
मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील प्रदिप उत्तम मगर हे घराला कुलूप लावून शुक्रवारी रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास थंडीत वाढ झाल्याने ते घराकडे स्वेटर घेवून जाण्यासाठी आले होते़ त्यावेळी घराचा दरवाजा उघडा दिसला आणि आतमध्ये आवाज येवू लागला़ त्यांना संशय आल्याने इतर तरूणांना बोलाविले़ कपाटातील दहा हजार रूपये घेवून येणाऱ्या चोरट्याच्या अंगावर कपाट पडल्याने तो जखमी झाला होता़ त्या अवस्थेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला़ त्याच्याकडून दहा हजार रूपये ताब्यात घेण्यात आले आहेत़ याप्रकरणी प्रदिप उत्तमराव मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन उर्फ विठ्ठल लक्ष्मण हागरे (रा़सावरगाव) तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास बीट अंमलदार प्रभाकर कुलकर्णी हे करीत आहेत़ (वार्ताहर)