साजापुरात बिबट्या
By Admin | Updated: December 4, 2014 00:56 IST2014-12-04T00:21:57+5:302014-12-04T00:56:08+5:30
वाळूज महानगर : साजापूर परिसरात आज पहाटे वीटभट्टीवरील मजुरांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

साजापुरात बिबट्या
वाळूज महानगर : साजापूर परिसरात आज पहाटे वीटभट्टीवरील मजुरांना बिबट्याने दर्शन दिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या नागरिकांनी वन विभागाकडे धाव घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
साजापूर शिवारातील गट नंबर ६५ मध्ये शेख हुसैन शेख रहीम यांची वीटभट्टी आहे. २ डिसेंबरला रात्री मजूर विटा थापण्याचे काम करीत होते. पहाटे २.३० ते ३ वाजेच्या सुमारास जोरजोरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येऊ लागल्यामुळे बबन खंडागळे याने तिकडे पाहिले असता त्यास अंधारात एका प्राण्याचे डोळे चमकत असल्याचे दिसून आले. घाबरलेल्या बबनने बॅटरीच्या प्रकाशात बघितले असता हा प्राणी त्याच्याकडे येत असल्याचे दिसून आले. बबनने धूम ठोकून याची माहिती मजुरांना दिली. भगवान पवार, राजू गायकवाड व अन्य ८ ते १० मजूर जमा झाले असता त्यांना एक बिबट्या व त्याचा बछडा खेळत वीटभट्टीजवळच्या मातीच्या ढिगाऱ्याकडे येताना दिसले. माती व पोयट्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्या व बछडा तब्बल अर्धा तास बागडत होते. मजुरांनी ही माहिती वीटभट्टीमालक शेख हुसैन यांना मोबाईलवर दिली. घाबरलेल्या मजुरांनी रात्र जागूनच काढली. या प्रकाराची माहिती मिळताच आज सकाळी उपसरपंच सय्यद कलीम, पोलीस पाटील रशीद पठाण, शेख नईम, शेख हुसैन आदींनी पाहणी केली.
यावेळी वीटभट्टीवरील माती व पोयट्याच्या ढिगाऱ्यावर बिबट्याचे ठसे त्यांना दिसून आले. उपसरपंच सय्यद कलीम यांनी दौलताबाद वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन पाहणी करण्याचे सांगितले. मात्र सायंकाळपर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळाकडे फिरकले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.