संत शक्ती मैदानात उतरली अन् विरोधकांचा सुपडासाफ झाला: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:42 IST2025-08-07T19:42:44+5:302025-08-07T19:42:58+5:30
'पुन्हा येतो म्हणलो की मी पुन्हा येतोच'

संत शक्ती मैदानात उतरली अन् विरोधकांचा सुपडासाफ झाला: देवेंद्र फडणवीस
वैजापूर : लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार करून प्रचार केला. त्यामुळे त्यांचे वोट जिहादचे आक्रमण हे हिंदू संस्कृतीवर आक्रमण आहे, हे जेव्हा आम्ही रामगिरीजी महाराज व संत शक्तीच्या लक्षात आणून दिले, तेव्हा सर्व संत शक्ती मैदानात उतरली. त्यामुळे विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शनि देवगाव येथे आयोजित कार्यक्रमात केले.
सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महंत रामगिरी महाराज, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. रमेश बोरनारे, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक प्रयोग झाला. या प्रयोगातून एकप्रकारे व्होट जिहाद ही व्यवस्था उभी राहिली आणि राष्ट्रीय विचारांना पराजित करण्यासाठी एकत्र आली. ज्यावेळी हे षडयंत्र लक्षात आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आवाहन केलं आणि सर्व संत शक्ती, आध्यात्मिक शक्ती मैदानात उतरली. त्यामुळे विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुन्हा येतो म्हणलो की मी पुन्हा येतोच
महंत रामगिरीजी महाराज यांच्या सारख्या साधू संतांनी आमचे सरकार तारले आहे. त्यांच्या आशीर्वादाने या सरकारचे काम चालू आहे. या सप्ताहातील अथांग महासागराप्रमाणे येथील भाविकांचा महासागर पाहून मी भारावून गेलो आहे. मी पुढच्या वर्षी या सप्ताहाला पुन्हा येणार आहे. आणि मी पुन्हा येतो, म्हणलो की पुन्हा येतोच, हा इतिहास आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.