छत्रपती संभाजीनगर : उपमहापौरपद तर गेले, किमान महापालिकेत गटनेतापद आपल्या समर्थकांना मिळवून देण्यात पालकमंत्री संजय शिरसाटांना अपयश आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रदीप जैस्वाल समर्थक नगरसेवक किशोर नागरे यांना गटनेतापदी नियुक्त करण्याचे आदेश सोमवारी मुंबईत दिले. या निर्णयामुळे पालकमंत्री शिरसाट यांना पुन्हा एकदा शह मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
महापालिका निवडणुकीपासून शिंदेसेनेत पालकमंत्री शिरसाट विरुद्ध आ. जैस्वाल व उपमहापौर राजेंद्र जंजाळ असा छुपा संघर्ष सुरू आहे. उपमहापौरपद शिंदेसेनेला देण्याचा निर्णय झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या नऊ नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेऊन उमेदवार देण्याची तयारी सुरू केली होती. दुसरीकडे, आ. जैस्वाल यांच्या गटातील राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले. विशेष म्हणजे हा निर्णय पालकमंत्र्यांना दूर ठेवून घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्र्यांना त्यांची कन्या हर्षदा यांना उपमहापौर करायचे होते, असा दावाही उपमहापौर जंजाळ यांनी केला होता.
पालकमंत्र्यांनी गटनेतापदासाठी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचे नाव पुढे केले होते. त्यांनी त्यांच्या समर्थक नगरसेवकांची बैठक घेऊन विभागीय आयुक्तांनाही तसे कळविले होते. मात्र, तुपे यांच्या नावाला आ. जैस्वाल आणि उपमहापौर जंजाळ यांनी विरोध केला होता.
दरम्यान, सोमवारी (दि. १६) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी शहरातील शिंदेसेनेचे सर्व नगरसेवक, पालकमंत्री शिरसाट, खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे, आ. रमेश बोरनारे, संपर्कनेते विलास पारकर, आदी उपस्थित होते. तेथे जंजाळ यांनी गटनेतापदासाठी किशोर नागरे यांचे नाव पुढे केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही नागरे यांच्या नावाला हिरवा कंदील दिला.
आम्ही विरोध केला नाही“महापालिकेत शिंदेसेनेच्या गटनेतापदी आ. जैस्वाल आणि उपमहापौर जंजाळ यांनी नगरसेवक किशोर नागरे यांच्या नावाची शिफारस केली. आम्हीही नागरे यांच्या नावाला विरोध केला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नावाला हिरवा कंदील दिला आहे.”- संजय शिरसाट, पालकमंत्री
Web Summary : Sanjay Shirsat faced another setback as Eknath Shinde appointed Kishor Nagare, supported by Pradeep Jaiswal, as group leader, overriding Shirsat's choice. This escalates the power struggle within the party.
Web Summary : संजय शिरसाट को फिर झटका लगा क्योंकि एकनाथ शिंदे ने प्रदीप जैस्वाल द्वारा समर्थित किशोर नागरे को समूह नेता नियुक्त किया, जिससे शिरसाट की पसंद खारिज हो गई। इससे पार्टी के भीतर सत्ता संघर्ष बढ़ गया।