संजय शिरसाटांनी करून दाखवले; आधी कॅबिनेट, तर आता पालकमंत्रिपदी वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 23:33 IST2025-01-18T23:33:25+5:302025-01-18T23:33:44+5:30

Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

Sanjay Shirsat has done it; first the cabinet, now the guardian ministership of Chhatrapati Sambhajinagar | संजय शिरसाटांनी करून दाखवले; आधी कॅबिनेट, तर आता पालकमंत्रिपदी वर्णी

संजय शिरसाटांनी करून दाखवले; आधी कॅबिनेट, तर आता पालकमंत्रिपदी वर्णी

Sanjay Shirsat : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाबाबत सस्पेन्स होता. मंत्रिमंडळाचा विस्तार अन् खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर, आज (18 जानेवारी) अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेना(शिंदे गट) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकत्व असेल. याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगरचे नेतृत्व शिवसेनेकडे
एक सामान्य शिवसैनिक, नगरसेवक चारवेळा आमदार अन् आता जिल्ह्याचे पालकमंत्री, असा संजय शिरसाटांचा राजकीय प्रवास आहे. राज्यातील अनेक आमदारांना पहिल्या किंवा दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदे मिळाली. पण, चारवेळा आमदार झालेल्या संजय शिरसाटांना अनेकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिली. 2014 मध्ये राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या शिरसाटांना आता अखेर मंत्रिपद मिळाले.

संतोष देशमुख प्रकरण भोवले; पालकमंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडेंचे नावच नाही...

विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले अन् उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यावेळी संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होत, पण तेव्हाही त्यांच्या पदरी निराशा आली. छत्रपती संभाजीनगरच्या शेजारील मतदारसंघ असलेल्या पैठणचे आमदार संदीपान भूमरे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिपदे मिळाली. 

अनेकदा मंत्रिपदाने दिली हुलकावणी

पुढे अडीच वर्षांनी राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हाही शिरसाटांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण, तेव्हाही शिरसाटांच्या मंत्रीपद मिळाले नाही. यामुळे शिरसाट पक्षावर नाराज होते. त्यांचे नाराजी दूर करण्यासाठी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. प्रत्येकवेळा मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यामुळे विरोधकांनीही अनेकदा त्यांच्यावर बोचरी टीका केली. पण, संजय शिरसाटांनी आशा सोडली नाही. अखेर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले अन् संजय शिरसाटांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. तर, आता त्यांना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

जे बोलले, ते करुन दाखवले...

विशेष म्हणजे, संजय शिरसाट विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगायचे, मी आमदार झाल्यावर कॅबिनेट मंत्री होणार. मंत्री झाल्यानंतर, मीच पालकमंत्री होणार असल्याचेही त्यांनी अनेकदा सांगितले होते. त्यांनी दोन्ही वेळा आत्मविश्वासाने घेतलेली जाहीर भूमिका सत्यात उतरली आहे.

पालकमंत्रिपदाची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
 

Web Title: Sanjay Shirsat has done it; first the cabinet, now the guardian ministership of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.