रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना?

By विकास राऊत | Updated: June 4, 2025 12:20 IST2025-06-04T12:18:35+5:302025-06-04T12:20:26+5:30

जलजीवन, वाॅटरग्रीडसाठी दिलेल्या वाळू ठेक्यातून बेकायदेशीर उपसा, १० कोटींचा महसूल बुडाल्याचा संशय

Sand mining for 5 days using a single royalty receipt; Government agencies embezzling crores from the revenue department? | रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना?

रॉयल्टीची एकच पावती ५ दिवस वापरून वाळू उपसा; सरकारी यंत्रणेकडून महसूलला चुना?

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर, वैजापूर तालुक्यातील वॉटर ग्रीड व जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी शिवना नदीच्या पात्रातील सनव या राखीव वाळू पट्ट्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १० हजार ६०० ब्रास वाळू उपसण्याचा ठेका ६३ लाख ६० हजार रुपयांच्या रॉयल्टीने घेतला आहे. मात्र, योजनेच्या कामाची तालू शहरात येत असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून शहरात विक्रीचा संशय बळावला आहे.

केवळ मनुष्य बळाच्या साहाय्याने वाळू उपसा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना, सध्या पट्ट्यामध्ये १० जेसीबी, २ पोकलेनद्वारे वाळू उपसण्याचा सपाटा सुरू आहे. १ मीटरपेक्षा जास्तीचे उत्खनन झाल्याची शक्यता असून प्राधिकरणासह, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गौण खनिज अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी डोळेझाक केली आहे. येथील वाळू खुल्या बाजारात बोगस चालान वापरून आणली जात असल्याचे पोलिसांनी गौण खनिज विभागाला, १६ मे रोजी पत्राने कळविले होते. गौण खनिज विभागाने देखील चालान अवैध असल्याचे उत्तर पोलिसांना दिले, परंतु सनव येथील स्थळपाहणी केली नाही. बेकायदेशीर उपशातून सुमारे १० कोटींचा महसूल बुडाल्याची शक्यता आहे.

ईटीएस मोजणी व्हावी...
भूमी अभिलेख आणि खासगी मोजणीद्वारे ईटीएस मोजणी करून मंजुरी किती आणि उपसा किती झाला आहे, हे तपासणे गरजेचे आहे. भूमी अभिलेख विभागाची मोजणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली, तर पारदर्शक होईल, अन्यथा तेथेही लपवाछपवी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, वाळूपट्ट्यात ३ डोजर सपाटीकरण करण्यासाठी उभे आहेत. मोजणीअंती सत्यता समोर येईल.

पोलिसांनी कळवूनही यंत्रणा शांत...
१६ मे रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी हायवा क्र. एमएच १७ बीवाय ८५५३ पकडला. सनव येथील ठेक्यातील ही वाळू शहरात येत होती. याबाबत गौण खनिज विभागाकडे पोलिसांनी विचारणा केली असता, गौण खनिज अधिकारी किशोर घोडके यांनी २० मे रोजी पोलिसांना पत्र दिले. त्यात ते म्हणाले, हायवा क्र. एमएच १७ बीवाय ८५५३ चा ईटीपी क्र. २४०४११४३ ची पावती मुदत १२ मेच्या दुपारी ३ पर्यंत होती. परंतु, त्या क्रमांकाची पावती १६ मेपर्यंत दिसत आहे. त्यानुसार ती वाळू वाहतूक अवैध आहे. पोलिसांनी कारवाई करून अहवाल द्यावा. दरम्यान शहरात जलजीवन मिशनच्या कामाची वाळू आलीच कशी, हा प्रश्न आहे.

मॅजिक पेन वापरून चालान ?
मॅजिक पेन वापरून बोगस चालान तयार केले. त्यावरून शासकीय योजनांसाठी राखीव असलेल्या वाळूपट्ट्यातील वाळू शहरात आणली गेली. पोलिसांनी हायवा जप्त केला. हा सगळा प्रकार दाबून ठेवण्यात आला. १२ मे रोजी तयार केलेले चालान १६ मे रोजी वापरले जाते, तरी याकडे महसूल प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. २ एप्रिल ते ३० जून २०२५ पर्यंत एमजीपी युजअंतर्गत असलेला वाळूपट्टा खुल्या बाजारात विक्रीसाठीही वापरल्याचे दिसत आहे.

Web Title: Sand mining for 5 days using a single royalty receipt; Government agencies embezzling crores from the revenue department?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.