मनपा आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामास मंजुरी
By Admin | Updated: July 8, 2014 00:34 IST2014-07-08T00:26:25+5:302014-07-08T00:34:07+5:30
परभणी: शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने ६ आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे.

मनपा आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामास मंजुरी
परभणी: शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने ६ आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी चार आरोग्य केंद्राच्या बांधकामास सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता देण्यात आली.
७ जुलै रोजी परभणी शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमहापौर सज्जुलाला, उपायुक्त दीपक पुजारी, उपायुक्त रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील पथदिवे, आरोग्य केंद्र, गुंठेवारी विकास नियमाधीन करणे या प्रश्नांवर चर्चा झाली. शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाई समस्येवरही विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला. पाणी उपलब्ध असताना नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करीत मनपाने नियोजन करावे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे व काँग्रेस नगरसेवकांनी केली.
एनयूएचएम अंतर्गत शहरात ६ आरोग्य केंद्रांना मान्यता मिळाली आहे. शहरामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा पोहचावी आणि गुणवत्ता सुधारुन एकात्मिक व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्याअंतर्गत साखला प्लॉट, खंडोबा बाजार, इनायत नगर, भाजी मार्केट, खानापूर सर्व्हे नंबर ६मधील प्लॉट अशा चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामास मान्यता देण्यात आली.
शहरातील पथदिव्यांच्या प्रश्नावर महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितले की, शहरामध्ये १२ हजार विद्युत पोल आहेत. त्यापैकी ३२ प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागात ४०० ते ५०० पोल येतात. ७ हजार पोलवर एलईडी लॅम्प बसविणे आणि दुरुस्ती यासाठी चार कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. मुख्य चौकामध्ये व स्मशानभूमी आणि कब्रस्थान या ठिकाणी हायमास्ट बसविले जाणार असून त्यासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. महात्मा फुले चौक, गव्हाणे चौक, ग्रॅन्ड कॉर्नर, शाही मशिद, आझम चौक, अण्णाभाऊ साठे चौक, अहिल्याबाई होळक़र चौक, पारदेश्वर मंदिर, कब्रस्थान, वसमतरोडवरील अकुंदशाह मियाँ दर्गा, खानापूर स्मशानभूमी, खानापूर चौक, तुरतपीर बाबा दर्गा, राजगोपालचारी उद्यान, साहेब जान लाला मशीद, बोबडे मेडिकल कॉर्नर व इतर चार अशा २० ठिकाणी हायमास्ट बसविले जाणार आहे. या सभेमध्ये प्रारंभी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे, प्राचार्य रामदास डांगे, माजी नगराध्यक्ष मीर हाशम अली, महापालिकेचे अधिकारी हनुमंत साबळे, मुंजाजी गाडगे, शेख मुस्तफा शेख करीम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनपाचे नूतन उपायुक्त रणजीत पाटील यांचा सत्कार महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघाचे खा. बंडू जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेना गटनेते अतुल सरोदे यांनी मांडला. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. सभेदरम्यान झालेल्या चर्चेमध्ये अॅड. जावेद कादर, डॉ. विवेक नावंदर, उदय देशमुख, अतुल सरोदे, आश्विनी वाकोडकर, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, शिवाजी भरोसे, अंबिका डहाळे, वनमाला देशमुख, सुनील देशमुख, विजया कनले, रजीया बेगम, तिरुमला खिल्लारे, संगीता दुधगावकर, संगीता कलमे, शांताबाई लंगोटे, संगीता वडकर, मीराबाई शिंदे, सुदामती थोरात, अर्चना नगरसाळे, आशाबाई नर्सीकर आदींनी सहभाग घेतला.
स्थायी समिती सदस्यांची निवड
या सभेमध्ये स्थायी समितीच्या ८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. राकाँचे मेहराज कुरेशी, रामराव गुजर, सुदामती थोरात, रेखा कानडे तर काँग्रेसचे संगीता दुधगावकर, वनमाला देशमुख, गणेश देशमुख आणि शारदाबाई मोरे यांची स्थायी सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली.े
एक कार्यमुक्त तर दुसरा अधिकारी निलंबित
पाणीपुरवठा अभियंता किशोर संद्री यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश महापौर प्रताप देशमुख यांनी दिले. तसेच फेरफार विभागाचे प्रमुख सुनील वसमतकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले.
पाणीप्रश्न गाजला
या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षनेते भगवानराव वाघमारे यांच्यासह इतर सदस्यांनी शहराला दहा-दहा दिवस पाणी येत नाही, नियोजन नाही, असा आरोप करीत शहरातील लिकेज काढावे, पाण्याच्या टाकीवर फोन ठेवावेत, फोन न उचलणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तर गटनेते अतुल सरोदे यांनी कर वसुली जास्तीत जास्त करावी, अशा सूचना करीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या प्रश्नावर चर्चा करताना सदस्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांविषयी तक्रारीचा सूर आवळला.