शिरसाट-जंजाळ वादाला अल्पविराम; महापालिका निवडणुकीत समन्वय ठेवण्याचे शिंदेंचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:10 IST2025-12-12T13:09:50+5:302025-12-12T13:10:57+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूर येथे त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली.

शिरसाट-जंजाळ वादाला अल्पविराम; महापालिका निवडणुकीत समन्वय ठेवण्याचे शिंदेंचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूर येथे आयोजित बैठकीत मुख्य समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीत दोन्ही नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. दोन्ही नेत्यांना आपसातील वाद बाजूला ठेवून समन्वयाने काम करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नागपूर येथे त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली. खा. संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि युवासेनेचे ऋषिकेश जैस्वाल यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. बैठकीत मुख्य समन्वय समिती आणि कार्यकारी समिती अशा दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. मुख्य समन्वय समितीकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज देणे, त्यांच्या मुलाखती घेणे आणि त्यांना उमेदवारी अर्ज देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या मुख्य समन्वय समितीमध्ये पालकमंत्री शिरसाट, खा. भुमरे, आ. जैस्वाल, जिल्हाप्रमुख जंजाळ आणि ऋषिकेश जैस्वाल यांचा समावेश आहे. शिरसाट हे पक्षात एकाधिकारशाही आणत असल्याचा जंजाळ यांच्या आरोपानंतर शिंदे यांनी ही समन्वय समिती नेमल्याचे दिसत आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारांना तिकीट देताना त्याची निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष मानला जाईल. वशिल्याने एकाही उमेदवाराला पक्ष तिकीट देणार नाही. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी पक्षाकडून विविध प्रभागांत सर्वेक्षण होईल. ज्या उमेदवाराला जनतेची पसंती मिळेल, त्यांनाच पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्य समन्वय समिती घेईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
शिंदसेेनेच्या समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात १२ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप होईल. २२ आणि २३ डिसेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती मुख्य समन्वय समिती घेईल.
कार्यकारी समिती
कार्यकारी समितीत आ. विलास भुमरे, माजी आ. किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, त्र्यंबक तुपे, अशोक पटवर्धन, नीलेश शिंदे आदींचा समावेश आहे.
स्टार प्रचारकही निवडले
यावेळी पक्षाने स्टार प्रचारकांमध्ये आ. रमेश बोरनारे, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे, माजी आ. कैलास पाटील, माजी आ. अण्णासाहेब माने आणि किशनचंद तनवाणी यांचा समावेश केल्याचे सूत्रांनी सांगितले.