छत्रपती संभाजीनगर : शहराच्या २३ व्या महापौरपदी मंगळवारी भाजपचे समीर राजूरकर, तर उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ विजयी झाले. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ७० मते पडली. विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या एमआयएमने महापौरपदासाठी अशोक हिवराळे, तर उपमहापौरपदासाठी मोहंमद वसीम यांना उमेदवारी दिली होती. दोघांना फक्त ३३ मतांवर समाधान मानावे लागले. ३७ मतांनी महायुतीने एमआयएमचा दारुण पराभव केला. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विरोधी बाकावरील उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी (शरद पवार)ने तटस्थ राहणे पसंत केले. काँग्रेसच्या एकमेव सदस्याची मतदानाप्रसंगी गैरहजेरी होती.
एप्रिल २०२० पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. साडेपाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जानेवारी महिन्यात निवडणूक घेण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही पक्षाला मतदारांनी बहुमत दिले नव्हते. २०२६ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमतापर्यंत कौल दिला. भाजपचे तब्बल ५७ उमेदवार निवडून आले. बहुमतासाठी ५८ सदस्यांची गरज असल्याने शिंदेसेनेच्या १३ सदस्यांना सत्तेत सोबत घेण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला होता. त्यामुळे महायुतीकडे ७० नगरसेवकांचे संख्याबळ होते.
मंगळवारी सकाळी १०:३० वाजेपासून नगरसेवक महापालिकेत येण्यास सुरुवात झाली. अगोदर एमआयएम नगरसेवक हिरवे फेटे, काळी शेरवानी घालून नेहरू भवन येथील पक्ष कार्यालयापासून पायी आले. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सर्व नगरसेवकांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पाठोपाठ भाजप नगरसेवक, नगरसेविका भगवे जाकीट, भगवे फेटे परिधान करून मनपा आवारात पोहोचले. शिंदेसेनेचे १३ सदस्यही यावेळी दाखल झाले. नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे, डाॅ. भागवत कराड, पालकमंत्री संजय शिरसाट, आ. संजय केणेकर, नारायण कुचे, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दिलीप स्वामी यांनी सकाळी ११:२७ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. अगोदर महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये महायुतीच्या ७० सदस्यांनी समीर राजूरकर यांना मतदान केले. त्यानंतर थोड्याच वेळात उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतही राजेंद्र जंजाळ यांना ७० मते मिळाली. दुपारी १:०० वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांचे स्वागत अगोदर पीठासीन अधिकारी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले. सचिव नंदकिशोर भोंबे यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना मदत केली.
१२ नगरसेवक राहिले तटस्थ११५ सदस्य असलेल्या महापालिकेत १०३ सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. १२ नगरसेवक तटस्थ राहिले, यामध्ये उद्धवसेनेचे ६, वंचित बहुजन आघाडीचे ४ आणि राष्ट्रवादी (शरद पवार)च्या एका सदस्याचा समावेश आहे, तसेच काँग्रेसच्या नगरसेविका मलिका हबीब कुरेशी या सभागृहात येऊन मतदानावेळी गैरहजर होत्या.
भाजपचे चारही इच्छुक एकाच बाकावरभाजपकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेले महेश माळवदकर, अनिल मकरिये, प्रमोद राठोड, विजय औताडे निवडणूक प्रक्रियेच्या वेळी समोरील एकाच बाकावर बसले होते.
आयुक्तांची नगरसेवकांना एक पिशवी भेट- एमआयएम पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक हाजी शेरखान यांचा मतदानासाठी सही करताना हात थरथरत होता. नगरसेवक ओसामा यांनी त्यांचा हात पकडून सही केली.- नगरसेवकांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी सदस्यांनी प्रशासनाला फोटोच दिले नाहीत, फोटो त्वरित सादर करण्याची सूचना प्रशासनाने केली.- आयुक्त जी. श्रीकांत यांनी सर्व नगरसेवकांना एक पिशवी भेट दिली. यामध्ये शाल, सभा कामकाज नियमावली पुस्तक, एक टोपी भेट होती.- निवडणूक खर्च सादर न केलेल्या नगरसेवकांनी त्वरित हिशेब न दिल्यास पद रद्द होण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.
निवडणुकीची टिकटिक अशी:११:२१ - वंदेमातरम्ने सभेला सुरुवात११:२६- उमेदवारांच्या अर्जांची छाननी११:२८ - प्राप्त वैध अर्जांची घोषणा११:२९- अर्ज मागे घेण्यास वेळ दिला११:४४ -वाजता अर्ज मागे घेण्याचा वेळ समाप्त११:४७ -वाजता महापौरपदासाठी मतदान१२:१९- उपमहापौरपदासाठी प्रक्रियेला सुरुवात१२:२५- वाजता अर्ज मागे घेण्यास वेळ१२:४० - वाजता अर्ज मागे घेण्याचा वेळ संपला१२:४२ - वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात१:०२ - वाजता प्राप्त मतांची घोषणा
Web Summary : BJP's Sameer Rajurkar became Chhatrapati Sambhajinagar's mayor, Rajendra Janjal deputy. They secured 70 votes each. MIM's candidates lost heavily. Shiv Sena (UBT), VBA, and NCP (Sharad Pawar) remained neutral. The election followed a long administrative period after municipal elections gave BJP a majority.
Web Summary : भाजपा के समीर राजूरकर छत्रपति संभाजीनगर के महापौर और राजेंद्र जंजाल उपमहापौर बने। दोनों को 70 वोट मिले। एमआईएम के उम्मीदवार हार गए। शिवसेना (यूबीटी), वीबीए और एनसीपी (शरद पवार) तटस्थ रहे। चुनाव नगरपालिका चुनावों के बाद हुआ, जिसमें भाजपा को बहुमत मिला।