मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार
By बापू सोळुंके | Updated: April 21, 2023 14:37 IST2023-04-21T14:36:56+5:302023-04-21T14:37:15+5:30
न्या.गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू केले पाहिजे.

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केल्याशिवाय मराठा समाजास आरक्षण मिळणारच नाही, हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्रीमंडळाने तातडीने बैठक बोलावून मराठा समाजा चा ओबीसी मध्ये समावेश करावा,अन्यथा संभाजी ब्रिगेड लढा उभारणार असल्याचे प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी सांगितले.
डॉ. भानुसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की, मराठा समाजाला केवळ ओबीसीमधूनच आरक्षण दिले जाऊ शकते, असे आम्ही अनेक वर्षापासून सांगत आहोत, मात्र आतापर्यंतच्या विविध पक्षाच्या सरकारने मराठा समाजाला ईएसबीसी आणि एस.इ.बी.सी. वर्गातील आरक्षण दिले. मात्र पुढे हे आरक्षण घटनेच्या चौकटीत नसल्याने टिकू शकले नाही. यामुळे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या परिस्थितीत शासनाने पुन्हा एकदा न्या.गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू केले पाहिजे. हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. वेगळा प्रवर्ग निर्माण करून ओबीसी अंतर्गत समांतर आरक्षण लागू केले जाऊ शकते.
शासनाने आपल्या संवैधानिक चौकटीत राहून न्या.गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे. तातडीने मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड तर्फे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.