कडक उन्हाची पर्वा न करता प्रज्ञासूर्याला अभिवादन; निळे झेंडे फडकवत तरुणाच्या मिरवणुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:01 IST2025-04-15T12:00:47+5:302025-04-15T12:01:21+5:30
संविधान बदलण्याचा कुणाच्या बापात दम नाही; ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली ग्वाही

कडक उन्हाची पर्वा न करता प्रज्ञासूर्याला अभिवादन; निळे झेंडे फडकवत तरुणाच्या मिरवणुका
छत्रपती संभाजीनगर : कडक उन्हाची पर्वा न करता सकाळपासूनच प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेटवर भीम अनुयायांची गर्दी झाली होती. ती दिवसभर चालूच होती. भडकलगेटचा सारा परिसर ‘जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा, महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ अशा घोषणांनी दणाणून गेला होता. जिकडे पाहावे तिकडे विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे भडकल गेटवर दिसत होते. भडकल गेटवर असा एकही कोपरा शिल्लक नव्हता की, जिथे बाबासाहेबांचे कटआऊट, पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले नव्हते.
यावेळीही बाबासाहेबांच्या प्रतिपुतळ्यास अभिवादन करावे लागले. कारण सध्या तेथे नव्या पुतळा उभारणीचे काम चालू आहे. विविध अडचणींवर मात करीत हा नवा पुतळा पुढील वर्षी जयंतीपर्यंत तयार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. भव्य स्टेजवर एका बाजूने जाण्याची व दुसऱ्या बाजूने उतरण्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात आली होती. स्टेजवर बाबासाहेबांचा पूर्णाकृती आणि अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. उपासक- उपासिका अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करीत होते. व बाबासाहेबांचा जयजयकारही करीत होते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी नवीनसिंह ओबेरॉय होते. या मंचावर राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी हजेरी लावली. लंडनमध्ये राहत असतानाचे बाबासाहेबांचे घर विकत घेऊन महाराष्ट्र सरकारने स्मारक केले आहे, याची आठवण देत सावे यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून लिहिलेले संविधान बदलण्याचा कुणाच्या बापात दम नाही, असे उद्गार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला. या मंचावर बाबूराव कदम, पृथ्वीराज पवार, अरविंद अवसरमल, बाळकृष्ण इंगळे, दौलत खरात, मगरे गुरुजी, स्वागताध्यक्ष शिवाजी कवडे आदींची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीच्या मंचावरही सावे-कराड यांनी हजेरी लावली. महेंद्र सोनवणे यांनी त्यांचे निळा फेटा बांधून स्वागत केले. प्रतिभा जगताप, कमल चक्रे आदींची मंचावर उपस्थिती होती.
बी.एस. मोरे प्रतिष्ठानच्या मंचावरून शिरा व पिण्याचे पाणी तर शाक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटीतर्फे बावीस प्रतिज्ञा, उद्देशिका व मिठाई वाटप करण्यात आली. ॲड. भन्ते बुद्धपाल यांनी या कामात पुढाकार घेतला होता. बी. एस. मोरे प्रतिष्ठानच्या मंचवर मोरे परिवार तसेच डॉ. प्रमोद दुथडे आदींची उपस्थिती होती. मित्र मित्र एकत्र येऊन बनवण्यात आलेल्या व कसलेही बॅनर न लावलेल्या मंचावर शिरा वाटप करण्यात येत होता. दुपारी रणरणत्या उन्हातही भडकलगेटच्या सर्व रस्त्यांनी निळे झेंडे फडकवत तरुणाच्या मिरवणुका येतच होत्या.