नांदेडात कार्बाईड आंब्याची विक्री
By Admin | Updated: May 17, 2016 00:04 IST2016-05-17T00:02:26+5:302016-05-17T00:04:13+5:30
नांदेड : शहरातील विविध ठिकाणी कार्बाईड आंब्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे़ याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़

नांदेडात कार्बाईड आंब्याची विक्री
नांदेड : शहरातील विविध ठिकाणी कार्बाईड आंब्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे़ याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़
महाराष्ट्र व इतर राज्यातून नांदेडात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे़ शहरातील जुना मोंढा, वजिराबाद, कलामंदिर, शिवाजीनगर, श्रीनगर आदी परिसरात आंब्यांची विक्री सुरू आहे़ कार्बाईडद्वारे पिकविण्यात आलेल्या आंब्यांना चांगला पिवळा रंग येतो़ दुरून हे आंबे पाहिल्यास साहजिकच खरेदीचा मोह आवरत नाही़ झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेकजण आंब्यांना कार्बाईडद्वारे पिकवित आहेत़ तेच आंबे बाजारात विक्रीसाठी आणले जातात़ हा प्रकार म्हणजे लाखो लोकांच्या जिवाशी खेळण्यासारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़ नागरिकांच्या आरोग्याशी कोणी खेळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर शासनाने सोपविली आहे़ अन्न, धान्य, खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्याचे कामही या विभागाकडे आहे़ तथापी, यावेळी एकाही आंबेविक्रेत्याविरुद्ध कारवाई झाली नाही, अशी माहिती आहे. २०११ पर्यंत महापालिकांना कार्बाईड आंबे, हॉटेलची तपासणी, हॉटेलला लायसेन्स देण्याचे अधिकार होते़ कायद्यात फेरबदल करून महापालिकांकडील हे अधिकार काढून घेण्यात आले़ आता हे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गेले. (प्रतिनिधी)