औरंगाबादमध्ये चोरीच्या दुचाकींची व्हॉट्सॲपवरून विक्री; टोळीतील एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 14:51 IST2020-12-18T14:49:09+5:302020-12-18T14:51:20+5:30
Bike Theft, Whatsapp छायाचित्र गरजू लोकांना व्हॉट्सॲपवर पाठवून विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला अटक

औरंगाबादमध्ये चोरीच्या दुचाकींची व्हॉट्सॲपवरून विक्री; टोळीतील एकाला अटक
औरंगाबाद : शहरातून चोरलेल्या मोटारसायकलींचे छायाचित्र गरजू लोकांना व्हॉट्सॲपवर पाठवून विक्री करणाऱ्या टोळीतील एकाला जिन्सी पोलिसांनीअटक केली. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या.
अझमत खान समशेर खान पठाण असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील अझमत खान हा खुलताबाद - औरंगाबाद रस्त्याने जात असताना फौजदार दत्ता शेळके यांच्या पथकाला त्याच्या मोटारसायकल क्रमांकाचा संशय आला. यामुळे त्यांनी परिवहन विभागाच्या ॲप्लिकेशनवर तो नंबर टाकून पाहिला असता तो नंबर दुसऱ्या मॉडेलच्या दुचाकीला दिल्याचे समजले. पोलिसांनी संशयावरून दुचाकीचालक अझमतला ताब्यात घेतले असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. चौकशीअंती त्याने त्याच्याजवळची मोटारसायकल शहरातील डी मार्टजवळून चोरी केलेली असल्याचे सांगितले.
याविषयी राजेशकुमार रामसुंदर यांनी तक्रार दिल्याचे समजले. अझमतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर अनेक दुचाकीचे छायाचित्र आणि रेट टाकलेले दिसले. याविषयी त्याने पोलिसांना सांगितले की, चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी तो मित्रांना तिचे छायाचित्र पाठवतो. कन्नड येथील एकाला त्याने मोटारसायकल विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या खरेदीदाराकडून मोटारसायकल जप्त केली. ही दुचाकी जालना रोडवरील एका हॉटेलसमोरून त्याने चोरली होती. याविषयी अलोक देसाई यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.