आॅफ अन् आॅनलाईनच्या घोळात वेतन रखडले
By Admin | Updated: May 12, 2015 00:50 IST2015-05-11T00:19:34+5:302015-05-12T00:50:47+5:30
लातूर : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे़

आॅफ अन् आॅनलाईनच्या घोळात वेतन रखडले
लातूर : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे़ आॅफ आणि आॅनलाईनच्या घोळामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन आदा होत नाही़ त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ कर्मचाऱ्यांनी आॅफलाईन बिले दिली आहेत़ मात्र वित्त विभागाने आॅनलाईनची सक्ती केल्यामुळे वेतन रखडले आहे़
लातूर जिल्ह्यात लिपीक, शिपाई, परिचर या प्रवर्गातील १ हजार १७२ शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत़ त्यांचे वेतन आॅफलाईन देण्यात यावे, असे निर्देष शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते़ मात्र वित्त विभागाने आॅनलाईनची सक्ती केल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही़ मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने शिक्षकेत्तर कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत़ वित्त विभाग, शिक्षणाधिकारी कार्यालयात तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकेत्तर कर्मचारी चकरा मारत आहेत़ मात्र आॅफलाईन, आॅनलाईनचा घोळ मिटत नाही़ शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी आॅफलाईन बिले सादर केली आहेत़ परंतु वित्त विभागाने त्याला अडकाटी आणली आहे़ दरम्यान, लातूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून, वेतन नसल्यामुळे कर्जाचे हप्ते, एलआयसीचे हप्ते थकले आहेत़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन आदा झाले तरी भुर्दंड सहन करावा लागणार आहे़ त्यामुळे प्रशासनाने तात्काळ वेतन आदा करावे, अशी मागणी संघटनेचे पांडुरंग देडे यांनी केली आहे़
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २०१२ पासून भविष्य निर्वाह निधीची पावती दिली जात नाही़ त्यामुळे भविष्य निर्वाह निधी किती जमा झाला याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळत नाही़ शिक्षण विभाग शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत नाही़ त्यामुळेच गेल्या तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे, असे संघटनेचे कार्यवाहक पांडुरंग देडे म्हणाले़
जून २०१५ पर्यंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन जुन्या प्रचलित पद्धतीने (आॅफलाईन) करण्यास मुदत वाढ आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळेतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईनद्वारे आदा करण्यात यावे, अशे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश आहेत़ मात्र तरीही वेतन दिले जात नसल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे़