करडईचे तेल ३२५ रुपये किलो; तरीही पेरणी क्षेत्र का वाढेना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:00 IST2025-11-04T14:55:10+5:302025-11-04T15:00:03+5:30
करडईच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी करडई पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

करडईचे तेल ३२५ रुपये किलो; तरीही पेरणी क्षेत्र का वाढेना?
छत्रपती संभाजीनगर : २५ ते ३० वर्षांपूर्वी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत करडईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आज करडई तेलाचे दर ३२५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मात्र मराठवाड्यातून करडईचे पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. करडईच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी करडई पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
करडईच्या तेलाचे भाव गगनाला
करडई तेल शरीरासाठी उपयुक्त मानले जाते. यामुळे याला चांगली मागणी असते. करडईचे उत्पादन घटल्याने करडईचे दर मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. सध्या बाजारात प्रति किलो ३२५ रुपये भाव आहे.
सहा महिन्यांत ८० रुपये किलोने वाढला भाव
सहा महिन्यांत करडई तेलाच्या दरात ७० ते ८० रुपये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. करडई तेलाची मागणी सतत वाढत असल्याने तेलाचे दरही वाढतच आहेत.
करडईचे तेल इतके महाग का?
करडईचे तेल आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. अन्य तेलांच्या तुलनेत करडईचे तेल मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे. यामुळे करडईचे तेल अन्य तेलांच्या तुलनेत महाग असल्याचे दिसून येते.
तरीही करडईचा पेरा कमी कशामुळे?
करडई तेलाचा दर प्रति किलो ३२५ पर्यंत वाढला असला तरी करडईचा पेरा मात्र वाढलेला नाही. कारण करडईचे पीक जेव्हा काढायला येते तेव्हा त्याला बारीक काटे असतात. हे काटे टोचतात म्हणून मजूर करडई काढणीसाठी येत नाहीत. मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी करडईचा पेरा कमी केला आहे.
जिल्ह्यात करडईचा पेरा ६६० हेक्टर
आपल्या जिल्ह्यात गतवर्षी करडईचा पेरा केवळ ६६० हेक्टर होता. मागील पाच वर्षांची सरासरी विचार करता जिल्ह्यात सरासरी ४०० हेक्टरपर्यंत करडईचा पेरा होता.
यंदा ५५० हेक्टरवर पेरणीचा अंदाज ?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा ५५० हेक्टरवर करडईचा पेरा होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
करडई पीक काढणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. शिवाय करडई ऐवजी शेतकरी अन्य नगदी पिकांकडे वळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करडईचा पेरा कमी झाला आहे. मात्र गतवर्षी पेरा २०० हेक्टरने वाढला होता.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक
कुठल्या तेलाचा किती भाव? (किलो)
करडई : ३२५
सोयाबीन : १३५
शेंगदाणा : १९०
सरकी : १४५
सूर्यफूूल : १५५
पामतेल : १२०