सिद्धार्थ उद्यानातून दुखद वार्ता; अर्पिता वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू
By मुजीब देवणीकर | Updated: September 13, 2023 18:08 IST2023-09-13T18:08:11+5:302023-09-13T18:08:43+5:30
इतर दोन बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.

सिद्धार्थ उद्यानातून दुखद वार्ता; अर्पिता वाघिणीच्या एका बछड्याचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील अर्पिता या पांढऱ्या वाघिणीने ७ सप्टेंबर रोजी ३ बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील एका बछडयाचा आज पहाटे १ वाजता मृत्यू झाला.
वीर व अर्पिता वाघांच्या जोडीच्या मिलनातून या बछड्यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपासून ३ बछड्यांपैक्की एकाची प्रकृती ठीक नव्हती. तो आईचे दुधही पित नव्हता. त्यामुळे ८ तारखेपासून त्याला बकरीचे दुध देण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्याची प्रकृती खालावली. आज पहाटे १ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. इतर दोन बछड्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत ४३ वाघांचा जन्म
देशभर वाघांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांचा जन्मदर मात्र चांगला आहे. येथे आतापर्यंत ४३ वाघांचा जन्म झाला आहे. पालिकेने देशभरातील अनेक प्राणिसंग्रहालयाला वाघ दिले आहेत. एकट्या समृद्धी वाघिणीने डझनभर बछड्यांना जन्म दिला आहे. पालिकेने १९९५ मध्ये पंजाबच्या सतबीर झूमधून पिवळ्या तर ओरिसातील भुवनेश्वर येथील प्राणिसंग्रहालयातून पांढर्या वाघांची जोडी आणली होती. त्यापासून आजवर ४३ वाघांचा येथे विस्तार झाला.