ग्रामविकास योजना बासनात
By Admin | Updated: June 23, 2014 00:19 IST2014-06-22T23:22:37+5:302014-06-23T00:19:06+5:30
विठ्ठल भिसे , पाथरी पर्यावरण संतुलीत ग्राम योजनेंतर्गत वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली खरी़ परंतु, अल्पावधीतच या योजनेला घरघर लागली़

ग्रामविकास योजना बासनात
विठ्ठल भिसे , पाथरी
पर्यावरण संतुलीत ग्राम योजनेंतर्गत वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली खरी़ परंतु, अल्पावधीतच या योजनेला घरघर लागली़ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटिकेवर लाखो रुपयांचा खर्च झाला़ रोपे तयार झाली़ परंतु, योजनेचे उदिष्ट्य मात्र पूर्ण करता आले नाही़ पर्यायाने आज या योजनेला घरघर लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून पर्यावरण संतुलित ग्राम योजनेंतर्गत वृक्ष लागवडीसाठी महत्त्व देण्यात आले़ शतकोटी वृक्ष लागवड मोहीमही राबविण्यात आली़
वृक्ष लागवड करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायती अंतर्गत रोपवाटिकांना मान्यता दिली़
दोन वर्षांत परभणी जिल्ह्यात एक हजारापेक्षा अधिक रोपवाटिका मंजूर करण्यात आल्या़ रोपवाटिकेवर कुशल आणि अकुशल असा लाखो रुपयांचा खर्चही झाला़ रोपवाटिकेत रोपे तयार झाली़ परंतु, तयार झालेली रोपे प्रत्यक्षात लागवड झाली की नाही हा गहन प्रश्न निर्माण झाला़ शासनाकडून उदिष्ट देण्यात आल्यानंतर शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, स्मशानभूमी, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली़
सुरुवातीच्या काळात मोहीम म्हणून अनेक गावांत वृक्ष लागवड झाली़
उदिष्ट्यांची पूर्ती झाली़ परंतु, लागवड करण्यात आलेल्या रोपांचे संवर्धन झाले नाही़ पर्यायाने आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपे तयार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होऊनही प्रत्यक्षात मात्र वृक्ष लागवड किती झाली याचा अंदाज घेणे प्रशासनालाही अवघड झाले आहे़
योजना चांगली असली तरी योजनेकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची उदासिनता असल्याने ही योजना बासनात गुंडाळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
सामाजिक वनीकरणचे वृक्ष गायब
ग्रामपंचायतींतर्गत वृक्ष लागवडीसोबतच शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात आली़ त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागांंतर्गतही रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली़
यासाठी लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले़ सेलू उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्यात जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा अधिक कामाचे अंदाजपत्रक तयार करून वृक्ष लागवड करण्यात आली आहे़ परंतु, जीवंत रोपांची संख्या मात्र नाममात्र असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
यावर्षी कार्यान्वितच नाही
दोन वर्षात जिल्हाभरात पर्यावरण संतुलित योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्याची मोहीम धुमधडाक्यात राबविण्यात आली़ लाखो रोपे लावून वृक्ष वाढीसाठी प्रशासनाने जिकीरीचे प्रयत्न केले़ परंतु, योजनेमध्ये कागदोपत्री घोडे नाचविल्याचा प्रकार दिसून आला़ यावर्षी मात्र वृक्ष लागवडीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे़
रोपांचा नाही ताळमेळ
कृषी विभाग आणि पंचायत समितीकडून रोप वाटिकांतून रोपे तयार करण्यात आली़ रोप वाटिकेतील रोपे लागवड करण्यासाठी पंचायत समितीने संबंधित रोपवाटिका धारकांना कोणत्या गावाला वाटप करावयाची या बाबत लेखी आदेशही कळविले़
रोपवाटिकेतील रोपे शेतात जाण्याऐवजी रोपवाटिकेत पडून राहिली़ तर कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेतील रोपे अर्धी तयारच झाली नाहीत़ तयार झालेले रोपे जळून गेली़ पर्यायाने पर्यावरण संतुलित योजनेच्या रोपांचा ताळमेळ मात्र प्रशासनाला बसविता आला नाही़