- श्यामकुमार पुरेसिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी ७.३० वाजता घाटनांद्रा येथून भराडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात चौथी ते सातवी कक्षेतील चिमुकले विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या एका स्कूलबसने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील ३५ मुलं वेळीच बाहेर पडल्याने बालंबाल बचवल्याने पालकांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, या घटनेमुळे खाजगी स्कूलबसमधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भराडी येथे सेमी इंग्रजी, इंग्रजी, माध्यमाची शाळा आहे. या शाळेत घाटनांद्रा, अंभई, दिडगाव, पळशी, आमठाणा, नाचनवेल व तालुक्यातील खेड्यापाड्यातून ५०० मुलं खाजगी वाहने व स्कूलबसने जाणेयेण करतात. भराडी येथील या शाळेत एकूण जवळपास १ हजार मूल शिक्षण घेतात यासाठी जवळपास १५ खाजगी बसेस आणि अनेक खाजगी वाहने रस्त्यावर धावतात. दरम्यान, आज सकाळी नेहमी प्रमाणे घाटनांद्रा येथून एक स्कूलबस घाटनांद्रा, दिडगाव, पळशी येथून विद्यार्थी घेऊन भराडीकडे निघाली. मात्र, आमठाणा गावाजवळ स्कूलबसमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली.
हे निदर्शनास येताच चालक व या बसमधील दोन शिक्षिकांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरण्यास सांगितले. विद्यार्थी स्कूलबॅग, टिफिन बॅग सोडून तत्काळ खाली उतरले. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. दरम्यान, एका शेतकऱ्याने शेतातील विहिरीतून पाइपद्वारे पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली.
३५ विद्यार्थी बालंबाल बचावले, पालक चिंतेतयात कसलीही जीवितहानी झाली नसून ३५ विद्यार्थी सुखरूप आहेत. विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग, टिफिन आगीत जळाले. या घटनेनंतर दुसरी बस मागवून सर्व विद्यार्थ्यांना भराडी येथील शाळेत सोडण्यात आले. मात्र, स्कूलबस जळून खाक झाल्याची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. अनेक पालकांनी शाळेत व शिक्षकांना फोन करून माहिती घेतली. तर काही पालकांनी शाळा गाठून संस्थाचालक, शिक्षक आणि स्कूलबस चालक, मालकाला खडे बोल सुनावले. दरम्यान, बसमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
सर्व विद्यार्थी सुरक्षित..स्कूलबस मधून अचानक धूर निघत असल्याची माहिती बसमधील दोन्ही शिक्षिकांनी दिली. त्यानंतर मी त्यांना तात्काळ मुलांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. काही क्षणात सर्व विद्यार्थी बाहेर पडली. त्यानंतर बसने पेट घेतला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. - सुनीता देवरे मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय भराडी.
बस आमची नाही ज्या बसमधून मुलांना शाळेत आणले जाते. त्या बसेस आमच्या नाहीत, खाजगी आहेत. पालकांनी भाडे तत्वावर लावल्या आहेत. या खाजगी बस चालकांना व ठेकेदारांना चांगल्या स्थितीतील बसेसमधूनच मुलांना आणण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. यापुढे खटारा बसेस मधून मुलांची वाहतूक बंद केली जाईल.- सुनील पाटील संस्था चालक स्वामी विवेकानंद सिल्लोड.